Thursday 1 February 2018

उच्चशिक्षण गुणवत्ता व संशोधनाला चालना देणारा अर्थसंकल्प: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे




कोल्हापूर, दि. १ फेब्रुवारी: सन २०१८-१९चा केंद्रीय अर्थसंकल्प हा उच्चशिक्षण गुणवत्ता व संशोधनाला चालना देणारा आहे. अर्थसंकल्पातील राईज बाय २०२२ (रिव्हायटलाइझिंग इन्फ्रास्ट्रक्चर अॅन्ड सिस्टीम्स इन एज्युकेशन) आणि पीएमआरएफ (प्राईम मिनिस्टर्स रिसर्च फेलोज्) या दोन अभिनव बाबी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी म्हटले आहे की, ब्लॅकबोर्ड टू डिजीटल बोर्ड पद्धतीने उच्चशिक्षणातील गुणवत्तेच्या जोपासनेचे लक्ष्य अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे. त्यामधून संशोधन व तद्अनुषंगिक पायाभूत सुविधा विकासासाठी राईज बाय २०२२ ही योजना महत्त्वपूर्ण ठरते. याअंतर्गत पुढील चार वर्षांत सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसेच, पंतप्रधान संशोधन फेलो (पीएमआरएफ) प्रकल्पांतर्गत दरवर्षी देशातील आघाडीच्या संस्थांमधून बी.टेक. झालेले एक हजार विद्यार्थी निवडून त्यांना आयआयटी व आयआयएस्सीसारख्या संस्थांमधून पीएच.डी. करण्यासाठी फेलोशीप देण्यात येईल. या संशोधकांनी संबंधित संस्थांमध्ये दर आठवड्याला किमान काही तास अध्यापन करणे अपेक्षित आहे. प्लॅनिंग व आर्किटेक्चरसाठी दोन पूर्णकालिक संस्थांची उभारणी आणि त्याच धर्तीवर आयआयटी व एनआयआयआयटीमध्ये १८ स्वायत्त संस्थांची उभारणी करण्याचा उपक्रमही महत्त्वाचा आहे. इन्स्टिट्यूट्स ऑफ एमिनन्स या योजनेला या आधीच सुरवात करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे दाखल झालेल्या एकूण शंभर प्रस्तावांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. ही योजनाही उच्चशिक्षण गुणवत्ता व पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्याखेरीज, वडोदरा येथे स्वतंत्र रेल्वे विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा सुद्धा अभिनव स्वरुपाची आहे. असेही डॉ. शिंदे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment