Wednesday 28 February 2018

मराठीत विपुल विज्ञान-साहित्य निर्मितीची आवश्यकता: डॉ. पी.पी. वडगावकर




शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमात उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या 'असे घडले भारतीय शास्त्रज्ञ' या पुस्तकाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी (डावीकडून) डॉ. बी.जी. कोळेकर, डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. वडगावकर व डॉ. जी.एस. गोकावी.


Dr. P.P. Wadgaonkar
कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: विज्ञान अधिक लोकप्रिय, लोकाभिमुख होण्यासाठी मराठीमध्ये विपुल प्रमाणात वैज्ञानिक साहित्याची निर्मिती होण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे असे घडले भारतीय वैज्ञानिक हे पुस्तक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे पारितोषिक वितरण व पुस्तक प्रकाशन अशा संयुक्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
डॉ. वडगावकर म्हणाले, विज्ञानविषयक जनजागृती करण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागे खरे प्रयोजन ते आहे. त्यामुळे आज डॉ. शिंदे यांचे भारतीय शास्त्रज्ञांची अत्यंत सुलभ भाषेत ओळख करून देणारे पुस्तक प्रकाशित होते आहे, ही अत्यंत समयोचित बाब आहे. एकविसाव्या शतकात विज्ञानवादाच्या प्रसारासाठी अशा प्रकारे व्यापक चळवळ करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनीही नवनवीन संशोधने करून ती प्रकाशित करण्यास प्राधान्य द्यायला हवे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सर्वत्र आदर होतो, हे लक्षात ठेवून ज्ञानार्जनास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Dr. D.T. Shirke
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आपल्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत अत्यंत जाणीवपूर्वक विज्ञान व पर्यावरणविषयक जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. त्या कामातून त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपल्या देशातल्याच परंतु अद्यापही आपल्याला माहिती नसलेल्या शास्त्रज्ञांचा नव्याने परिचय करून देण्याची मोलाची कामगिरी त्यांनी बजावली आहे. त्यांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. यापुढील काळातही त्यांच्या हातून अशी विज्ञानसेवा घडत राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उप-कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी पुस्तकाविषयी माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे डॉ. वडगावकर यांच्या हस्ते विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. जी.एस. गोकावी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. जी.बी. कोळेकर यांनी आभार मानले.

असे घडले भारतीय शास्त्रज्ञ या पुस्तकाविषयी...
शिवाजी विद्यापीठाचे उप-कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी असे घडले भारतीय शास्त्रज्ञ हे पुस्तक लिहीले असून या पुस्तकात त्यांनी जगदीशचंद्र बोस यांच्यापासून ते डॉ. वसंत गोवारीकर यांच्यापर्यंत सुमारे ३१ भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवन व कार्याचा अत्यंत सुलभ व ओघवत्या शैलीत परिचय करून दिला आहे. कोल्हापूर आकाशवाणीसाठी त्यांनी या शास्त्रज्ञांविषयी मालिका लिहीली होती. त्याचे विस्तृत रुप म्हणजे हे पुस्तक आहे. या पुस्तकाला कोल्हापूर आकाशवाणीचे अधिकारी श्रीपाद कहाळेकर यांची अत्यंत अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. कोल्हापूरच्या अक्षर-दालन प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

Tuesday 27 February 2018

शाहू महाराज खऱ्या अर्थाने वंचितांचे मसीहा: डॉ. एस.टी. बागलकोटी


शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन करताना डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. एस.टी. बागलकोटी. सोबत अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. व्ही.बी. ककडे आदी.



शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात बोलताना डॉ. एस.टी. बागलकोटी. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. व्ही.बी. ककडे, डॉ.एम.एस. देशमुख, डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. डी.सी. तळुले.


कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: स्वतःला शेतकरी, कामगार आणि सैनिक यांच्यातीलच एक समजणारे छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने वंचित, शोषित, गोरगरीबांचे मसीहा होते, असे प्रतिपादन धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठाचे प्रा. डॉ. एस.टी. बागलकोटी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांचे विचार व धोरण यांचे समकालीन औचित्य या विषयावर दोनदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बीजभाषक म्हणून ते बोलत होते. मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील होते.
Dr. S.T. Bagalkoti
डॉ. बागलकोटी म्हणाले, समाजामध्ये समानता, सामाजिक न्याय आणि वैश्विक बंधुत्वाची भावना प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र झटणारे राजर्षी शाहू महाराज यांची अंगिकृत कार्याप्रती पराकोटीची निष्ठा होती. ब्राह्मणी वर्चस्ववादावर प्रहार करीत असतानाच ब्राह्मणेतर समाजामध्ये आत्मोन्नतीची भावना चेतविण्याचे महत्कार्य त्यांनी केले. भेदभाव न करण्याचे रयतेला आदेश जारी करीत असताना जातवर्चस्वाच्या भावनेपासून खालच्या वर्गांची मुक्तता करणे ही ब्रिटीशांपासून मुक्तता मिळविण्याइतकाच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे, असे त्यांचे मत होते. राज्याच्या विकासात प्रत्येक समाजघटकाचा समान वाटा व समान संधी असली पाहिजे, असे त्यांचे मत होते आणि त्या दिशेने त्यांनी प्रयत्न चालविले होते. त्यामुळे शाहू महाराजांकडे आपण समावेशी धोरणाचे एक आदर्श प्रतीक म्हणून पाहण्याची गरज आहे.
शाहू महाराज हे उच्चकोटीचे कृतीशील अर्थतज्ज्ञ होते, असे मत व्यक्त करून डॉ. बागलकोटी म्हणाले, शाहू महाराजांनी शेती, सिंचन, पायाभूत सुविधा विकास, रस्ते विकास, पणन-विपणन, लघु व मध्यम उद्योगांचा विकास आदी अनेक क्षेत्रांचा साकल्याने विचार व विकास केला. त्यामध्ये लोकसहभाग मिळविण्यासाठी प्रयत्न केले. उर्ध्वगामी प्रशासनाच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी प्रयत्न केले. गावपंचायत व्यवस्थांची निर्मिती करून लोकांना स्व-प्रशासन देण्याची तयारी दाखविणारे ते एक सच्चे प्रशासक होते. त्यांच्या चरित्रापासून कृतीशीलता, अंगिकृत कार्याप्रती निष्ठा आणि समर्पण या गुणांचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घेण्याची गरज आहे. सहभागात्मक विकास, संसाधनांचे समन्यायी वाटप, शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा विकासावर भरीव व नेमका खर्च, शेतीच्या वृद्धीला मदत, सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रयत्न, अंधश्रद्धा निर्मूलन आणि विद्वानांचा योग्य आदर या बाबी करण्यासाठी शाहूचरित्रापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. या देशाच्या विकासासाठी शाहूंचे विचार व कार्य आजही अत्यंत उपयुक्त आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Dr. J.F. Patil
अध्यक्षीय भाषणात डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले, लोकशाहीत धोरण निर्धारित करणाऱ्या संस्था जेव्हा निष्क्रिय होतात, तेव्हा स्वातंत्र्याला, सामाजिक न्याय प्रस्थापनेला मर्यादा पडतात. समावेशी विकासाला अडथळा करतात. नव्वदोत्तरी कालखंडात देशात मोठ्या प्रमाणात असमानता वाढू लागली. सामाजिक-आर्थिक दरी वाढू लागली. असमानता आणि समावेशी विकास या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात येऊ शकत नाही. अर्थात, वाढती असमानता ही समावेशी वृद्धीमधील सर्वात मोठी आडकाठी आहे. ही असमानता दूर करण्यासाठी हिरीरीने प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जी व्यवस्था प्रत्येकाला रोजगार देऊ शकते, ती खऱ्या अर्थाने समावेशी स्वरुपाची असते, याची जाणीव ठेवून काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. एम.एस. देशमुख यांनी आभार मानले. डॉ. व्ही.पी. कट्टी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. व्ही.बी. ककडे, डॉ. डी.सी. तळुले, डॉ. आर.जी. दंडगे, डॉ. एस.टी. कोंबडे, डॉ. एस.पी. पंचगल्ले यांच्यासह संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday 26 February 2018

विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांमुळे अधिसभेचा दर्जा उंचावेल:

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा विश्वास




Dr. Devanand Shinde
कोल्हापूर, दि. २६ फेब्रुवारी: विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या समावेशामुळे शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचा दर्जा निश्चितपणे आणखी उंचावेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक आज राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात पार पडली. त्यावेळी अधिसभा सदस्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार झालेल्या निवडणुकांनंतर अधिसभेमधून अन्य अधिकार मंडळांवर निवडून द्यावयाच्या सदस्यांच्या निवडीसाठी आजची विशेष अधिसभा बोलावण्यात आली होती. नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाला परिचय करून दिल्यानंतर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सभागृहाला संबोधित केले. ते म्हणाले, या सभागृहात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींबरोबरच कला, साहित्य, वक्तृत्व, शेती, सहकार आदी क्षेत्रांत महत्त्वाचे आणि मोलाचे योगदान देत असलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. त्यांच्या सहभागामुळे विद्यापीठाची अधिसभा ही अधिक समग्र व सर्वसमावेशक बनली आहे. सहकार्य, संवाद आणि सहभाग या त्रिसूत्रीच्या बळावर विद्यार्थ्यांच्या आणि विद्यापीठाच्या व्यापक हिताच्या व वृद्धीच्या दृष्टीने अधिक उपयुक्त व दूरगामी निर्णय घेण्यात ही अधिसभा यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विद्यापीठाच्या सर्व अधिकार मंडळांच्या बैठकांचे कामकाज माहिती-संवाद तंत्रज्ञानाच्या (आय.सी.टी.) सहाय्याने पूर्णतः ऑनलाईन करण्याचा मनोदय कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. या कामी सर्व सदस्यांकडून सकारात्मक सहकार्य मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठ अधिकार मंडळांच्या बैठकांसाठी आदर्श संकेतसूची तयार करण्यात येईल, जेणे करून नवनियुक्त सदस्यांना सभागृहांचे संकेत माहिती होतील. तसेच, सर्व सभागृहांच्या सदस्यांसाठी लवकरच विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यापीठाने प्लास्टीकमुक्तीचा संकल्प केला असल्याने सभागृहात सदस्यांना प्लास्टीकच्या बाटल्यांऐवजी स्टील किंवा काचेच्या ग्लासमधून पाणी वाटप करण्याचे ठरविले आहे. या उपक्रमासही सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनाचे सदस्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
--००--

Friday 23 February 2018

संख्याशास्त्राचा क्रिकेटमध्ये प्रभावी वापर शक्य: डॉ. एम.बी. राजर्षी


शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय संख्याशास्त्र चर्चासत्रात बोलताना डॉ. एम.बी. राजर्षी. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. डी.एन. काशीद, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. श्रीमती एच.व्ही. कुलकर्णी.


कोल्हापूर, दि. २३ फेब्रुवारी: क्रिकेटमधील वाढती गुंतागुंत लक्षात घेता या खेळाला अधिक पारदर्शक व अधिक अचूक बनविण्यासाठी संख्याशास्त्राचा अत्यंत प्रभावी वापर करता येणे शक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ व पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातील संख्याशास्त्र अधिविभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. एम.बी. राजर्षी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागामार्फत आयोजित स्टॅटीस्टिकल मॉडेलिंग अँड एप्लीकेशन्स या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
डॉ. राजर्षी म्हणाले, संख्याशास्त्राचे उपयोजन क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करता येणे शक्य आहे. विशेषतः क्रिकेटसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकप्रिय आणि गतिमान झालेल्या खेळाच्या बाबतीत विश्लेषणात्मक अचूकता येण्याच्या दृष्टीने संख्याशास्त्र मोठे योगदान देऊ शकते. क्रिकेटमध्ये सध्या प्रचलित असलेले काही नियम बरेचदा वादग्रस्त ठरतात. त्यात सुधारणा करण्याबरोबरच आणखी नवे विश्लेषणाचे पर्याय देण्याचे काम संख्याशास्त्र निश्चित प्रभावीपणाने करू शकते. उदयोन्मुख संख्याशास्त्रज्ञांनी अशा प्रकारे विविध क्षेत्रांतील नवनवे पर्याय व संधी शोधण्यासाठी कार्यरत होण्याची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी सैद्धांतिक आणि व्यावहारिक आकडेवारीचे शास्त्रीय उपयोजन संख्याशास्त्रात कशा प्रकारे करता येईल, यासंदर्भातील विवेचन केले.
यावेळी संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. डी.एन. काशीद यांनी स्वागत केले तर समन्वयक डॉ. एच.व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सुकुमार राजगुरू यांनी आभार मानले तर डॉ. डी.एम. सकटे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी संख्याशास्त्रज्ञ डॉ. के. मुरलीधरन, टी.व्ही. रामनाथन्, राहुल गुप्ता, एस.बी. मुनोळी, शारदा भट, ए.एस. तलवार, माजी विभाग प्रमुख डॉ. आर.एन. रट्टीहळ्ळी, डॉ. एस.बी. महाडीक, सोमनाथ पवार, एस. एस. सुतार यांच्यासह जम्मू, कर्नाटक, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतील विद्यापीठांतून शिक्षक, संशोधक विदयार्थी, संलग्नित महाविदयालयांतील प्राध्यापक, संख्याशास्त्राचे अभ्यासक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.