Saturday 29 December 2018

डॉ. अंजली निगवेकर यांच्या अनुभवाचा

संगीतशास्त्र अधिविभागास लाभ: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या दिव्यांग अधिविभाग प्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे यांच्यासह संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातील शिक्षक.


शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या दिव्यांग अधिविभागप्रमुख

कोल्हापूर, दि. २९ डिसेंबर: विविध गायन कलाप्रकारांत निष्णात असलेल्या डॉ. अंजली निगवेकर यांच्या अनुभवाचा लाभ संगीतशास्त्र अधिविभागाला निश्चितपणे होईल. विद्यापीठ प्रशासनाचे त्यांना सर्वोतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल येथे दिली.
विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या प्रमुखपदी डॉ. अंजली निगवेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. डॉ. निगवेकर या दृष्टी दिव्यांग असूनही त्यांनी संगीत विशेषतः गायन अध्यापनात स्वतःचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. तेव्हा कुलगुरूंनी त्यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, संगीतशास्त्र अधिविभागातील शिक्षक निखील भगत, डॉ. विनोद ठाकूरदेसाई आणि सुप्रिया टिपुगडे आदी उपस्थित होते.
आपल्या दिव्यांगत्वाची कोणतीही सबब पुढे न करता गेली सुमारे २८ वर्षे डॉ. निगवेकर विद्यापीठात अध्यापन कार्य करीत आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अधिविभाग प्रमुखपदाची जबाबदारीही त्या तितक्याच समर्थपणे सांभाळतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.
डॉ. निगवेकर या १९८६मध्ये संगीतशास्त्र अधिविभागात विद्यार्थिनी म्हणून प्रवेशित झालेल्या होत्या. त्यानंतर डॉ. भारती वैशंपायन यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतशास्त्र विषयात पीएच.डी. केली असून १९९१पासून शिवाजी विद्यापीठात गेली २८ वर्षे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. विद्यार्थिनी ते अधिविभागप्रमुख असा त्यांचा येथील प्रवास आहे.

Friday 28 December 2018

नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांचा विद्यापीठात ‘आविष्कार’

शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी संशोधकांकडून त्यांच्या संशोधनाची माहिती घेताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आदी.


शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी संशोधकांकडून त्यांच्या संशोधनाची माहिती घेताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आदी.

शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी संशोधकांकडून त्यांच्या संशोधनाची माहिती घेताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आदी.

शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी संशोधकांकडून त्यांच्या संशोधनाची माहिती घेताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आदी.

कोल्हापूर, दि. २८ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्या वतीने संयोजित आविष्कार २०१८-१९या संशोधनविषयक स्पर्धेचे द्घाटन कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी झाले. विद्यापीठाच्या लोककला सभागृहात झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, समन्वयक तथा अधिष्ठाता डॉ.ए.एम.गुरव, डॉ. पी.एस. पाटील उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी सहभागी संशोधक विद्यार्थ्याकडे जाऊन त्यांच्या प्रकल्पांविषयी जाणून घेतले. विविध अभिनव विषयांवरील सादरीकरण विद्यार्थ्यांनी केल्याचे पाहून कुलगुरू डॉ. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आणि सहभागी संशोधकांचे अभिनंदनही केले.
शिवाजी विद्यापीठांतर्गत जिल्हास्तरीय, पदव्युत्तर मध्यवर्ती अशा या त्रिस्तरीय संशोधन स्पर्धेला संशोधक विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. आजच्या स्पर्धेत सुमारे दोनशे संशोधकांनी सहभाग दर्शविला. भाषा, ललितकला, शिक्षणशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, कायदा, मूलभूत विज्ञान, कृषी पशुसंवर्धन अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि वैद्यक औषधनिर्माण शास्त्र अशा विविध विषयांमधील शोधनिबंध, पोस्टर सादीकरण, पॉवरपॉईं सादरीकरण आणि मॉडेल्स अशा विविध प्रकारांत त्यांनी आपले संशोधन मांडले. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच एम.फील.व पीएच.डी.चे संशोधन करणारे संशोधक विद्यार्थी, शिक्षक स्पर्धेत सहभागी झाले. दरम्यान, शुक्रवार दि. जानेवारी २०१९ रोजी विद्यापीठात आयोजित आविष्कार स्पर्धेत पदवी स्तरावरील संशोधक विद्यार्थ्यांबरोबरच आजच्या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या पदव्युत्तर स्तरावरील स्पर्धकही सहभागी होणार आहेत, अशी माहिती समन्वयक डॉ. गुरव यांनी दिली.

Thursday 27 December 2018

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांना यंदाचा

प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते १२ जानेवारीला प्रदान समारंभ



कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची माहिती

Dr. N. D. Patil
कोल्हापूर, दि. २७ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांना आज जाहीर करण्यात आला. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शनिवार, दि. १२ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (स्व.) प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांची ठेव प्रदान केली आहे. श्रीमती शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या सामंजस्य करारातून शिवाजी विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्काराची संयुक्त निर्मिती करण्यात आली. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. रुपये १ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव (२०१६), रयत शिक्षण संस्था (२०१७), ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल (२०१८) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी पुरस्कारासंदर्भात अधिक माहिती देताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नेते व विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जडणघडणीत डॉ. एन.डी. पाटील यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. समाजकारणासाठी राजकारणाचा वापर करणाऱ्या एका ध्येयनिष्ठ विचारवंतांच्या फळीचे ते प्रतिनिधी आहेत. नैतिकता हा त्यांच्या प्रत्येक कार्याचा आणि आंदोलनाचा प्रमुख कणा आहे. त्या बळावरच त्यांनी अगदी अलिकडच्या टोल हटाव आंदोलनापर्यंतची अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, शेतकरी, कष्टकऱ्यांची, कामगारांची चळवळ असो किंवा आजही अव्याहत सुरू असलेला कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमाप्रश्नाचा लढा असो, डॉ. पाटील यांनी या साऱ्या चळवळींना प्राप्त करून दिलेले नैतिक अधिष्ठान ही फार मोलाची बाब आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आग्रही असणाऱ्यांत आघाडीवर असलेल्या डॉ. पाटील यांनी स्थापनेनंतरच्या कालखंडातही विद्यापीठाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीच्या सदस्यत्वापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे अधिसभा सदस्य, कार्यकारिणी सदस्य, सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता असा अनेकांगांनी झाला. शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या योगदानाबद्दल सन २००६मध्ये विद्यापीठाची सर्वोच्च मानद पदवी डी.लिट. देऊन त्यांचा गौरव केला आहे.

यावेळी शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले की, समितीच्या अवघ्या एकाच बैठकीत आणि एकमताने यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ. एन.डी. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकारिता आणि शिक्षण या पाच क्षेत्रांत अधिकारपूर्ण आणि सहज वावर असणारे हे व्यक्तीमत्त्व आहे. संविधान आणि कायद्याच्या शिस्तीतच त्यांनी आपला संघर्ष मांडला. रायगड येथील विशेष आर्थिक क्षेत्रांसाठी (सेझ) संपादित केलेल्या सुमारे ३६ हजार एकर जमिनीसाठीचा लढा हा ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. छोट्या छोट्या शेतकऱ्यांना संघटित करून व्यवस्थेविरुद्ध अशा प्रकारचा लढा यशस्वी करणे सहजशक्य बाब नव्हती. मात्र पाटील सरांनी केवळ आपल्या शिस्तबद्ध व्यूहरचनेच्या बळावर तो यशस्वी केला. अद्यावत संदर्भांच्या अभ्यासासह भूमिका घेण्याचा त्यांचा गुणधर्म हा एकमेवाद्वितिय स्वरुपाचा आहे. त्यांना पुरस्कार देताना होणारा आनंद हा त्यामुळे खूप मोठा आहे.


यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील, प्राचार्य डॉ. बी.ए. खोत आदी उपस्थित होते.



डॉ. एन.डी. पाटील यांचा संक्षिप्त परिचय


संपूर्ण नाव : डॉ. नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ ढवळी (नागाव), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म
शिक्षण : एम.ए. (अर्थशास्त्र), पुणे विद्यापीठ, (१९५५); एल.एल.बी. पुणे विद्यापीठ (१९६२)
अध्यापन कार्य:
  • १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच कमवा व शिकाया योजनेचे प्रमुख व रेक्टर
  • १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य:
  • शिवाजी विद्यापीठ पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य (१९६२)
  • शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य (१९६५)
  • शिवाजी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य (१९६२-१९७८)
  • शिवाजी विद्यापीठ सामाजिकशास्त्र विभागाचे डीन (१९७६-१९७८)
  • सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य (१९९१)
  • रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- (१९५९ पासून)
  • रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – (१९९० पासून)
  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष – (१९८५ पासून)
राजकीय कार्य:
  • १९४८ शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
  • १९५७ मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
  • १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी एकूण १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
  • १९६९- १९७८, १९८५ २०१० शे.का.प.चे सरचिटणीस
  • १९७८-१९८० सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य
  • १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी)
  • १९९९-२००२ निमंत्रक, लोकशाही आघाडी सरकार
  • महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते.
मिळालेले सन्मान / पुरस्कार:
  • भाई माधवराव बागल पुरस्कार (१९९४)
  • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड डी.लीट.पदवी (१९९९)
  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद) भारत सरकार (१९९८ २०००)
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ डी.लीट. पदवी (२०००)
  • विचारवेध संमेलन, परभणी अध्यक्षपद (२००१)
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर डी.लीट. पदवी (२००६)
  • शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे:
  • रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल- सदस्य
  • समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी उपाध्यक्ष
  • अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र अध्यक्ष
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा अध्यक्ष
  • जागतिकीकरणविरोधी कृती समिती मुख्य निमंत्रक
  • म.फुले शिक्षण संस्था, इस्लामपूर अध्यक्ष
  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, बेळगाव अध्यक्ष
  • महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन:
  • समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
  • शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका) (१९६२)
  • काँग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका) (१९६२)
  • शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका) (१९६३)
  • वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट (पुस्तिका) (१९६६)
  • महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे (White Paper) कृष्णस्वरूप (पुस्तिका) (१९६७)
  • शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत (पुस्तक) (१९७०)
  • शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी? (पुस्तिका) (१९९२)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (पुस्तिका)
  • नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण, (२००१) (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने)
रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य:
  • चेअरमन पदाच्या काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रमशाळा, साखरशाळा, नापासांची शाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षक केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील इन्फॉर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिकाया योजनेवर भर, स्पर्धा परीक्षा केंद्रे, गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना यांची राबवणूक, दुर्बल शाखा विकास निधी, महर्षी वि. रा. शिंदे अध्यासन केंद्र आदींची स्थापना, कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती. 
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

Monday 24 December 2018

समाजसेवा करण्याची सर्वाधिक संधी प्रशासकीय सेवेत: विकास खारगे



वन विभागाचे सचिव विकास खारगे


कोल्हापूर, दि. २४ डिसेंबर: समाजसेवा करण्याची मनापासून तळमळ असेल तर ती करण्याची सर्वाधिक संधी शासकीय, प्रशासकीय सेवेत मिळते. त्यासाठी युवकांनी जरुर या सेवांचा विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सेवापूर्व मार्गदर्शन केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवेतील संधी या विषयावर श्री. खारगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते, तर शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी रंगनाथ नाईकडे, हणमंत धुमाळ, श्री. भोसले प्रमुख उपस्थित होते.
प्रशासकीय सेवेचे महत्त्व सांगताना श्री. खारगे म्हणाले, या सेवेमध्ये अधिकाऱ्याला जनसेवेची मोठी संधी मिळत असते. किंबहुना, या सेवेसाठीच त्याला विशिष्ट अधिकार प्रदान करण्यात आलेले असतात. त्या अधिकारांचा वापर संबंधित अधिकारी किती जबाबदारीने आणि सकारात्मक पद्धतीने करतो, यावर त्याच्या सेवेचे मूल्यमापन अवलंबून असते. महत्त्वाचे म्हणजे जबाबदारी घेणाऱ्या अधिकाऱ्याला विविध ठिकाणी सेवा बजावण्याची आणि आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधीही येथे प्राप्त होत असते. त्यामुळे युवकांनी या सेवेकडे ऐहिक सुखांचा लाभ करवून देणारी सेवा अशा दृष्टीने पाहण्याऐवजी समाजाप्रती आपले कर्तव्य बजावण्याची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे.
केवळ प्रशासकीय सेवा हेच केवळ चांगले क्षेत्र आणि इतर क्षेत्रे चुकीची, असे मात्र तरुणांनी मानता कामा नये, असे सांगून श्री. खारगे म्हणाले, सर्वच क्षेत्रे चांगली आहेत. प्रशासकीय सेवेत लाखो उमेदवारांमधून मोजक्या उमेदवारांना संधी मिळत असते. त्यामुळे इथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची निवड होण्याची शक्यता नसते. त्यामुळे ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे, अशा क्षेत्राची वेळीच निवड करून त्या माध्यमातून तरुणांनी देशसेवेची संधी बजावली पाहिजे. कोणतेही क्षेत्र गौण न मानता आपली आवड लक्षात घेऊन तिला मेहनतीची, अभ्यासाची जोड देऊन यशस्वी होण्याची कुवत स्वतःमध्ये निर्माण करावी आणि आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असेही त्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीची सर्वसाधारण तत्त्वे सांगताना श्री. खारगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी निर्मळ मनाने आणि अगदी मनोभावे, आवडीने अभ्यास करावा. मेहनत आणि परिश्रमाला इथे पर्याय नाही. दर्जेदार पुस्तकांचा संदर्भासाठी वापर करावा. ती मुळापासून वाचण्यास प्राधान्य द्यावे. मुद्देसूद टिपणे काढावीत. स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा, अभ्यासण्याचा दृष्टीकोन एकात्म स्वरुपाचा असावा. म्हणजे एकाच वेळी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचा सर्वंकष विचार करून त्या तिन्हींचा अभ्यास करण्याची गरज आहे. महाविद्यालयातील विविध उपक्रमांत सहभागी व्हावे, जेणे करून संघटन कौशल्य, नेतृत्वगुण, खिलाडू वृत्ती, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची सांघिक भावना तुमच्यात निर्माण होईल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा कधीही वाया जाणारा नाही. उलट व्यक्तीमत्त्व विकासासाठी तो अत्यंत उपयुक्त आहे. कोणत्याही क्षेत्रात गेलात, तरी त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे. न्यूनगंड बाजूला ठेवून इच्छाशक्ती आणि संय या जोरावर स्पर्धा परीक्षांत यशस्वी होणे सहजशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली दशसूत्री विद्यार्थ्यांना दिली. ते म्हणाले, ध्येयप्राप्तीच्या इच्छेला अभ्यासाची जोड द्यावी. आपल्या मर्यादा ओळखून त्यावर मात करण्याच्या दृष्टीने अभ्यास करावा. चांगली पुस्तके तसेच माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी वापर करावा. नियमित वृत्तपत्रे व मासिकांचे वाचन करावे. गटचर्चा तसेच लिहीण्याच्या सरावाला प्राधान्य द्यावे. स्पर्धा परीक्षांच्या अधिकृत संकेतस्थळांवरुन ताजा अभ्यासक्रम पाहून त्यानुसार अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे आणि चांगल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख तसेच केंद्र प्रमुख डॉ. पी.एस. कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक, प्रशासकीय सेवक, वन विभागाचे अधिकारी यांच्यासह स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी प्रचंड संख्येने उपस्थित होते.


Friday 21 December 2018

आपत्ती व्यवस्थापनामध्ये एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे - निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे

                    
कोल्हापूर, दि.21 डिसेंबर - देश पातळीवरील आपत्ती व्यवस्थापनामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोलाचे योगदान करीत आहेत, असे प्रतिपादन कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय, युवा आणि खेल मंत्रालय, भारत सरकार शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.15 ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न झालेल्या 'राष्ट्रीय एकात्मता शिबीर - 2018' च्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.वि.स.खांडेकर भाषा भवन सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर होते.
 निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे पुढे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांना आदर्श कुटुंबाप्रमाणे एकत्रित समंजसपणे राहण्याची उत्तम शिकवण या माध्यमातून मिळत असते.राष्ट्रीय सेवा योजनेचे देशातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासामध्ये फार मोठे योगदान आहे.अशा उपक्रमांमधून महाराष्ट्राच्या संस्कृतीबरोबरच देशाच्या संस्कृतीचे जवळून अभ्यास करणे विद्यार्थ्यांना शक्य होते.
         राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय, पुणे येथील विभागीय संचालक डी.कार्तिकेयन आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, या शिबिरांमध्ये घडलेले विद्यार्थी देशातील विविध भागांमध्ये सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक पातळीवर अग्रेसर आहेत.आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना विद्यार्थ्यांनी विवेकी विचाराने संयमाने सामोरे गेले पाहिजे.
        अध्यक्षीय भाषणामध्ये कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर म्हणाले, देशाला अखंड ठेवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये देशभावना प्रथम असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांचा योग्य आणि काळजीपूर्वक वापर समाजासाठी, राज्यासाठी आणि देशाच्या हितासाठी केला पाहिजे.स्वत:बरोबरच इतरांनाही आनंदी ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी सहकार्याची भावना जोपासली पाहिजे.
          कार्यक्रमाच्या सुरूवातीला रा.से.यो.विभागीय कार्यालय, पुणे येथील अधिकारी आर.सईदा रामावथ यांनी या शिबिराचा आढावा घेतला. या प्रसंगी, सहभागी शिबिरार्थी आणि समन्वयकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यापीठाच्या रा.से.यो.चे संचालक डॉ.डी.के.गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी,रा.से.यो.चे समन्वयक डॉ.डी.जी.चिघळीकर यांचे समवेत विविध राज्यातील रा.से.यो.चे विद्यार्थी, संघ व्यवस्थापक मोठया संख्येने उपस्थित होते.

-----