Wednesday 6 December 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्रष्टे धोरणकर्ते: डॉ. पी.एस. कांबळे





कोल्हापूर, दि. ६ डिसेंबर: भारताच्या सर्वंकष विकासाचा रोडमॅप आखून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे धोरणकर्ते होते, असे मत अर्थशास्त्रज्ञ डॉ. पी.एस. कांबळे यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने ६१व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विकास नितीबाबत विचार व सद्यस्थिती या विषयावर डॉ. कांबळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताच्या विकासनीतीमधील योगदान स्पष्ट करताना डॉ. कांबळे यांनी बाबासाहेबांनी स्टेस्ट एन्ड मायनॉरिटीज् या ग्रंथात मांडलेले विचार, भारतीय राज्यघटना, शेती आणि उद्योगनीती या अनुषंगाने मांडणी केली. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तीमत्त्व अष्टपैलू होते. स्वतंत्र भारताच्या विकासाचे धोरण कसे असावे त्याची व्याप्ती रचना यांची मांडणी त्यांनी भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच करून ठेवली. भारताच्या विकासाचे शेती उद्योग हे महत्त्वाचे भागीदार असून त्यांची मालकी सरकारकडे असणे आवश्यक आहे. शेतजमिनीच्या तुकडीकरणाने कृषी उत्पादन कमी होत असून त्यातून आर्थिक प्रश्न निर्माण होताहेत. त्यामुळे शेतजमिनीचे राष्ट्रीयीकरण करणे गरजेचे आहे. विमा ही सरकारची मक्तेदारी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक नागरिकाचा आर्युविमा उतरविणे आवश्यक आहे. भारतामध्ये प्राथमिक शिक्षण महत्वाचे आहेच, परंतु त्याचबरोबर उच्च शिक्षणही गरजेचे आहे. यासाठी शिक्षणाचा सर्व खर्च केंद्र राज्य सरकार या दोघांनी केला पाहिजे. तसेच शिक्षणासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करणे आवश्यक आहे. समाजातील वंचित घटकांना विदेशी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने विशेष तरतूद करण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादन केली आहे.

विकासाच्या धोरणामध्ये सकारात्मक दृष्टीकोनाची आवश्यकता बाबासाहेबांनी व्यक्त केल्याचे सांगून डॉ. कांबळे म्हणाले, राजकीय, आर्थिक, सामाजिक समतोल साधण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या धुनिक धोरणामुळे शहरी ग्रामीण यांच्यातील समतोल बिघडत चालला असून आर्थिक सामाजिक विषमतेबरोबरच उपभोग खर्चावरील विषमताही वाढत आहे. शिक्षण हा समाजाचा अविभाज्य घटक असताना शिक्षणाच्या खाजगीकरणातून सामाजिक वंचितता वाढत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अशी कमालीची विषमतेची दरी असलेला विकास अपेक्षित नव्हता. म्हणून डॉ. आंबेडकरांची विकास निती सरकारच्या धोरणात समाविष्ट झाली पाहिजे, असे मतही डॉ. कांबळे यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणामध्ये केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, संपूर्ण भारताच्या विकासाच्या नियोजना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा समावेश झाला पाहिजे. बाबासाहेब भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात श्रम, र्जा जलमंत्री असताना त्यांनी विकासासाठी जी धोरणे मांडलेली आहेत, ती आजही तितकीच उपयुक्त असून त्याची अंलबजावणी होण्याची गरज आहे. 

यावेळी तेजश्री सावंत यांनी प्रास्ताविक मेघाताई कांबळे यांनी परिचय करून दिला. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. प्रतिभा पाटणकर, डॉ. एस.एस. कांबळे, प्रा. जी.बी. अंबपकर, अविनाश भाले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment