Friday 22 September 2017

शिक्षणामधील व्यापारीकरण थांबविणे आवश्यक - खासदार संजयकाका पाटील


कोल्हापूर, दि.22 सप्टेंबर - सध्या सुरु असलेले शिक्षणामधील व्यापारीकरण थांबविणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील निलांबरी सभागृहामध्ये चौदावी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा विद्यापीठ आणि संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी युवा संसद सदस्यांना मार्गदर्शन करताना खासदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के उपस्थित होते.
          खासदार संजयकाका पाटील पुढे म्हणाले, खऱ्या अर्थाने सर्व सामान्य मुलांपर्यंत निस्पृहपणे शिक्षण पाहचविण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. संसदेमध्ये सामाजिक प्रश्न उपस्थित करताना प्रथम त्या विषयाची सखोल माहिती अभ्यासणे आवश्यक असतेे.  सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विधायक चर्चा होऊन विकासाचे नवे मार्ग खुले होतात.
          अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रथमत: इतरांचे एेकण्याची कला अवगत केली पाहिजे. त्यामुळे हाती घेतलेले विधायक कार्य पूर्ण करण्यास गती प्राप्त होते.
कार्यक्रम समन्वयक डॉ.प्रल्हाद माने यांनी स्वागत प्रास्ताविक केले. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव यांनी आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ.व्ही.डी.नांदवडेकर, समन्वयक प्रा.पवन शर्मा, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.ए.रायकर, डॉ.व्ही.वाय.धुपदाळे, डॉ.मनोहर वासवानी, आर.एस. पाटील, हर्षद ठाकूर, संतोष सुतार उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील पंचावन्न युवा संसद सदस्य सहभागी झाले होते. परदेशी पाहुणे म्हणून केनियाचे ब्रॅन रॉय, हेसला लुईस हे उपस्थित होते.
          यशवंत पुकळे, निखिता पिसे, नवीन राऊत, राजश्री गोसावी, हेरंब सावंत, रोहिणी अवताडे यांना विशेष संसद पुरस्कार मिळाला. भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून विशेष गौरव करण्यात येणार आहे.
-----



No comments:

Post a Comment