Friday 22 September 2017

कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादन


कोल्हापूर, दि.22 सप्टेंबर - कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठामध्ये आज त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीसमोरील कर्मवीर पाटील यांच्या पुतळयास विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये त्यांच्या प्रतिमेस प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी खासदार संजयकाका पाटील, कुलसचिव डॉ.व्ही.डी.नांदवडेकर, प्रा.पवन शर्मा, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.ए.रायकर, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव, उपकुलसचिव जी.एस.राठोड, डॉ.व्ही.वाय.धुपदाळे, आर.एस.पाटील यांच्यासह अधिकारी, प्रशासकीय सेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
-----

शिक्षणामधील व्यापारीकरण थांबविणे आवश्यक - खासदार संजयकाका पाटील


कोल्हापूर, दि.22 सप्टेंबर - सध्या सुरु असलेले शिक्षणामधील व्यापारीकरण थांबविणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील निलांबरी सभागृहामध्ये चौदावी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा विद्यापीठ आणि संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी युवा संसद सदस्यांना मार्गदर्शन करताना खासदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के उपस्थित होते.
          खासदार संजयकाका पाटील पुढे म्हणाले, खऱ्या अर्थाने सर्व सामान्य मुलांपर्यंत निस्पृहपणे शिक्षण पाहचविण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. संसदेमध्ये सामाजिक प्रश्न उपस्थित करताना प्रथम त्या विषयाची सखोल माहिती अभ्यासणे आवश्यक असतेे.  सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विधायक चर्चा होऊन विकासाचे नवे मार्ग खुले होतात.
          अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रथमत: इतरांचे एेकण्याची कला अवगत केली पाहिजे. त्यामुळे हाती घेतलेले विधायक कार्य पूर्ण करण्यास गती प्राप्त होते.
कार्यक्रम समन्वयक डॉ.प्रल्हाद माने यांनी स्वागत प्रास्ताविक केले. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव यांनी आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ.व्ही.डी.नांदवडेकर, समन्वयक प्रा.पवन शर्मा, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.ए.रायकर, डॉ.व्ही.वाय.धुपदाळे, डॉ.मनोहर वासवानी, आर.एस. पाटील, हर्षद ठाकूर, संतोष सुतार उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील पंचावन्न युवा संसद सदस्य सहभागी झाले होते. परदेशी पाहुणे म्हणून केनियाचे ब्रॅन रॉय, हेसला लुईस हे उपस्थित होते.
          यशवंत पुकळे, निखिता पिसे, नवीन राऊत, राजश्री गोसावी, हेरंब सावंत, रोहिणी अवताडे यांना विशेष संसद पुरस्कार मिळाला. भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून विशेष गौरव करण्यात येणार आहे.
-----



Thursday 21 September 2017

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक लोक प्रथमच एकत्र - प्रा. अशोक चौसाळकर



कोल्हापूर दि.20 सप्टेंबर - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक लोक प्रथमच एकत्र आले, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले.
          शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभाग आणि सामाजिक वंचितता समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. प्रभाकरपंत कोरगावकर स्मृती व्याख्यानमालेत ''संयुक्त महाराष्ट्र चळवळ : स्वरूप फलश्रुती'' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अरुण भोसले होते.
      प्रा.चौसाळकर म्हणाले, 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' ही तमाम मराठी भाषिकांनी जात, धर्म, पंथ, इ. भेद विसरून लढवलेली चळवळ होती. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने शेकाप किंवा कम्युनिस्ट पक्षासारख्या डाव्या पक्षांनी मोठे योगदान दिलेले आहे. सेनापती बापट, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, नानासाहेब गोरे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम. जोशी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी अत्यंत संयमाने ही चळवळ हाताळली. त्यामुळे काही अपवाद वगळता यामध्ये फार मोठा हिंसाचार किंवा दंगे - धोपे घडले नाहीत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेले लोक देखील मोठया संख्येने होते. शाहीर अमरशेख अण्णाभाऊ साठे, गवाणकरांच्या कलापथकानेही या लढयामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. संयुक्त महाराष्ट्र समितीची ताकद वाढविण्यामध्ये डॉ. आंबेडकरांच्या शेडयूल कास्ट फेडरेशनची फार महत्त्वाची भूमिका होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अरूण भोसले म्हणाले, महाराष्ट्र राज्य निर्मितीचे जितके श्रेय संयुक्त महाराष्ट्र समितीने केलेल्या चळवळीचे आहे तितकेच श्रेय यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणातील मुत्सदेगीरीला दयावे लागेल.
इतिहास विभागप्रमुख सामाजिक वंचितता समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. नंदा पारेकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस कै. प्रभाकरपंत कोरगावकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. डॉ. अवनीश पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर श्री अविनाश भाले यांनी आभार मानले.
व्याख्यानासाठी सामाजिकशास्त्रे विभागाच्या अधिष्ठाता प्रा. भारती पाटील, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रकाश पवार, प्रा. रविंद्र भणगे, प्रा. शिवाजी जाधव, श्री. सुरेश शिपुरकर, डॉ. निलांबरी जगताप, प्रा. य. ना. कदम, इ. मान्यवर विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी डॉ. किशोर खिलारे, श्री. उमेश भोसले, श्री. शरद पाटील यांनी परिश्रम घेतले.
------