Monday 2 January 2017

महर्षी वि.रा. शिंदे यांचा बहुजनवाद सर्वसमावेशक: डॉ. सदानंद मोरे




शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात बोलताना डॉ. सदानंद मोरे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. राजन गवस, सुजाता पवार, डॉ. एन.डी. पाटील, डॉ. टी.एस. पाटील, डॉ. रणधीर शिंदे.

कोल्हापूर, दि. २ जानेवारी: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा बहुजनवाद हा समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेणारा सर्वसमावेशक स्वरुपाचा होता. त्यांचा हा बहुजनवाद समजून घेणे ही आजची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनामार्फत महर्षी वि.रा. शिंदे यांची बहुजनविचाराची संकल्पना आणि सद्यस्थिती या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बीजभाषक म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गो.मा. पवार होते, तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांची उद्घाटक म्हणून प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, काँग्रेसच्या चळवळीपासून अंतर राखून असणाऱ्या बहुजन समाजाच्या मनात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य महर्षी शिंदे यांनी केले. बहुजन समाजामध्ये स्वतःच्या उद्धाराची चेतना निर्माण करणारे ते एक आद्य समाज क्रांतीकारक होते. अठरापगड जातीच्या लोकांनी एकत्र येऊन स्वराज्याच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी सभा घेतल्या. बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक प्रयोग केले. त्या काळात सर्वांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील होते. पक्षीय राजकारण हे जातीच्या नव्हे, तर आर्थिक पायावर उभे राहिले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते, असेही ते म्हणाले.
डॉ. एन.डी. पाटील म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात महर्षी वि.रा. शिंदे यांचे कार्य आणि कर्तृत्व अद्वितिय आहे. ज्या कालखंडात त्यांनी काम केले, त्या काळात महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात चिंताजनक वातावरण होते. सामाजिक चळवळीबद्दल समाजातच मोठी अनास्था होती. सामाजिक क्षेत्रात काळाच्या पुढे जाऊन अतिशय पुरोगामी पाऊल उचलणारे आणि राजकीय क्षेत्रातही आपले वैचारिक योगदान देऊन स्थान निर्माण करणारे महर्षी शिंदे हे महान समाजचिंतक होते. दुर्दैवाने त्यांच्या कार्याची महाराष्ट्राने म्हणावी तितकी दखल घेतली नाही. त्यांच्या कार्याचा अभ्यास सामाजिक महाराष्ट्राच्या परिप्रेक्ष्यातून करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. गो.मा. पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनात महर्षी शिंदे यांनी मोठी घुसळण केली. महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचे युगप्रवर्तक कार्य केले. त्यानंतरच्या काळात त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी महर्षी शिंदे यांनी बजावली.
यावेळी डॉ. टी.एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले. यावेळी महर्षी शिंदे यांची नात सुजाता पवार यांच्यासह डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. गोपाळ गुरू, डॉ. रविंद्र ठाकूर, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. भारती पाटील, डॉ. मेघा पानसरे, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, सदा डुम्बरे, सुरेश शिपूरकर, उन्मेष अमृते आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment