Thursday, 26 April 2018

शिवाजी विद्यापीठात एसएसबी मार्गदर्शन कक्ष सुरू करणार: एनसीसी मानद कर्नल तथा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

एनसीसीच्या छात्रांकडून मानवंदना स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा एनसीसीचे नूतन मानद कर्नल डॉ. देवानंद शिंदे.


एनसीसीच्या छात्रांकडून मानवंदना स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा एनसीसीचे नूतन मानद कर्नल डॉ. देवानंद शिंदे.


शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना एनसीसीच्या मानद कर्नलपदाचे सन्मानपत्र प्रदान करताना ब्रिगेडियर पी.एस. राणा. सोबत (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कर्नल एम.एम. चौधरी, मानद मेजर रुपा शहा.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना एनसीसीचे मानद कर्नलपद प्रदान करण्यात आल्यानंतर सन्मानदर्शक बॅटन प्रदान करताना ब्रिगेडियर पी.एस. राणा. सोबत (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कर्नल एम.एम. चौधरी, मानद मेजर रुपा शहा.


कोल्हापूर, दि. २६ एप्रिल: सेनादलांत अधिकारीपदी भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी.) परीक्षांसाठी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन कक्ष सुरू करण्याचा मनोदय कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
कुलगुरू डॉ. शिंदे यांना आज सकाळी राष्ट्रीय छात्र सेनेचे (एन.सी.सी.) मानद कर्नलपद प्रदान करण्याचा समारंभ पार पडला. पदस्वीकृतीनंतर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह ब्रिगेडियर पी.एस. राणा, कर्नल एम.एम. चौधरी, मानद मेजर रुपा शहा व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने एनसीसीसाठी आपल्या परिसरात मोठी जागा उपलब्ध करून देऊन एनसीसीच्या उपक्रमांना चालना देण्याचे काम चालविले आहे. त्याचप्रमाणे पदवी स्तरावर एनसीसी हा विशेष लष्करी अभ्यासक्रमही विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुरू करण्यात आला आहे.  विद्यापीठात ज्याप्रमाणे युपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते; त्याच धर्तीवर एसएसबी परीक्षांसाठीही मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात येईल. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय दिनांच्या प्रसंगी विद्यापीठ प्रांगणात एनसीसीची परेड आयोजित करण्यासंदर्भातही एनसीसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने समाविष्ट होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि क्रीडा स्पर्धांत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्यांना काही सवलती अगर अधिक गुण प्रदान करता येतील का, या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ब्रिगेडियर पी.एस. राणा म्हणाले, एनसीसी ही भारतीय लष्करापेक्षाही अधिक युवकांची संख्या असणारी शिस्तबद्ध संघटना असून प्रशिक्षित व देशप्रेमाने भारित नागरिक निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या संघटनेच्या कार्याला बळकटी प्राप्त होण्यासाठी शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आदी व्यवस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे. विद्यापीठाच्या सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग प्राप्त होऊन नूतन मानद कर्नल कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात एनसीसीची जोमाने वृद्धी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ब्रिगेडियर राणा यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. शिंदे यांना मानद कर्नलपदाचे केंद्रीय मुख्यालयाकडून प्राप्त सन्मानपत्र व एनसीसी बॅटन प्रदान करण्यात आले.
तत्पूर्वी, ब्रिगेडियर राणा आणि कर्नल चौधरी यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या कक्षापासून मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील कार्यक्रम स्थळापर्यंत त्यांना सन्मानपूर्वक पाचारण केले. तेथे एनसीसीचे छात्र व एनसीसी बँड यांच्याकडून मानद कर्नल कुलगुरू डॉ. शिंदे यांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी कर्नल एम.एम. चौधरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांचा परिचय करून दिला. मानद मेजर रुपा शहा यांनी यावेळी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रा. संध्या जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवेडकर यांनी आभार मानले.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, निवृत्त कर्नल थोरात यांच्यासह विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिष्ठाता, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक, विद्यार्थी, एनसीसी छात्र व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 20 April 2018

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना एनसीसीचे मानद कर्नलपद२६ एप्रिल रोजी विशेष प्रदान सोहळ्याचे आयोजन 
 

Dr. Devanand Shinde
 कोल्हापूर, दि. २० एप्रिल: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एन.सी.सी.मध्ये कर्नल कमांडंट या मानद कर्नलपदाचा बहुमान प्रदान करण्याचा निर्णय एनसीसीच्या केंद्रीय मुख्यालयाकडून घेण्यात आल्याचे विद्यापीठास कळविण्यात आले आहे. येत्या गुरूवारी (दि. २६ एप्रिल) विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरू डॉ. शिंदे यांना विशेष सोहळ्याद्वारे कर्नलपदाचा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली आहे.

कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय छात्र सेनेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयाकडून विद्यापीठाच्या कुलगुरूंना एनसीसीचे मानद कर्नलपद प्रदान केले जाते. एनसीसीच्या विविध उपक्रमांना विद्यापीठ परिक्षेत्रात प्रोत्साहन व चालना देण्यामधील कुलगुरूंची प्रमुख भूमिका लक्षात घेऊन हा बहुमान त्यांना देण्यात येत असतो. त्यानुसार शिवाजी विद्यापीठास मुंबईस्थित एनसीसी महाराष्ट्र महासंचालनालयाचे अपर महासंचालक मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांच्याकडून नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. कोल्हापूर ग्रुपचे एनसीसी प्रमुख ब्रिगेडियर पी.एस. राणा, कर्नल एम.आर. चौधरी, कर्नल एफ.एफ. अंकलेश्वरा आणि ऑनररी मेजर रुपा शहा यांनी कुलगुरूंची प्रत्यक्ष भेट घेऊन हे पत्र त्यांना प्रदान केले. त्यानुसार, एनसीसीतर्फे येत्या गुरूवारी (दि. २६ एप्रिल) सकाळी १० वाजता विद्यापीठात विशेष गार्ड ऑफ ऑनर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांना अत्यंत सन्मानपूर्वक मानद कर्नलपद प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी कुलगुरू एनसीसीच्या छात्रांकडून सलामी स्वीकारतील. त्यानंतर कुलगुरू पत्रकार परिषदेस संबोधित करतील, अशी माहितीही कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी दिली.

 

Saturday, 14 April 2018

लोकशाहीत नैतिक मूल्यांचा ऱ्हास चिंताजनक: डॉ. गोपाळ गुरू
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी (डॉवीकडून) डॉ. जे.एस. बागी, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. गोपाळ गुरू, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. एस.एस. महाजन.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू.


शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: लोकशाहीत नैतिक मूल्यांचा ऱ्हास होणे ही चिंतेची बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा.डॉ. गोपाळ गुरू यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही संकल्पना या विषयावर ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.
Dr. Gopal Guru
डॉ. गुरू म्हणाले, डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत लोकशाहीत एक व्यक्ती, एक मत याच्या बरोबरीने एक व्यक्ती, एक मूल्य या तत्त्वाला नितांत महत्त्व आहे. माणुसकी हे महत्त्वाचे मूल्य आहे. ते वृद्धिंगत होण्यासाठीचे प्रयत्न म्हणजे लोकशाही होय. मात्र, सद्यस्थितीत या मतांचे वस्तूकरण होऊन त्याचे मूल्य बाजारीकरणाच्या माध्यमातून वसूल करण्याचा प्रयत्न दिसतो, तेव्हा त्या मताचे अवमूल्यन तर होतेच, मात्र तिथे नैतिकतेचाही अधःपात, पराभव होतो.  लोकशाही हा शब्द सातत्याने वापरून आपण तो गुळगुळीत करून टाकला आहे. त्याचे निःसत्त्वीकरण केले आहे. तथापि, लोकशाहीच्या नितीमत्तेची बाजू मात्र आपण सोयीस्कररित्या विसरून टाकतो. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचार व कार्यामुळे लोकशाहीच्या संकल्पनेला नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. या नैतिक अधिष्ठानाच्या बळावर समाजातील शोषित, वंचित, आदिवासी, भटके-विमुक्त आदी समाजघटकांना जेव्हा त्यांचे म्हणणे मांडण्याची, विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते, तेव्हा तिथे खऱ्या लोकशाही प्रस्थापनेची सुरवात होते. अशा प्रकारची स्वातंत्र, समता व बंधुता या मूलभूत मूल्यांवर अधिष्ठित लोकशाही बाबासाहेबांना अभिप्रेत होती.
आंबेडकरांच्या लोकशाही संकल्पनेत सन्मान, आत्मसन्मान आणि बुद्धिप्रामाण्यवाद यांना अत्युच्च महत्त्व असल्याचे सांगून डॉ. गुरू म्हणाले, सन्मान आणि आत्मसन्मान यांच्यातील द्वंद्वही समजून घेणे ही महत्त्वाची गरज आहे. सध्या भौतिकवादी व्यवस्थेच्या भोवतालामध्ये विविध प्रकारचे सन्मान, प्रतिष्ठा मिळविणे ही सोपी बाब आहे. मात्र, त्यातून आत्मसन्मान मिळेलच, याची खात्री नाही. आजच्या बाजारपेठीय लोकशाहीमध्ये एखाद्याने कोणती आणि किती किंमत मोजून सन्मान प्राप्त करून घेतला आहे, यावरुन या द्वंद्वाला नवे परिमाण प्राप्त होते. आणि त्यावरुनच आत्मसन्मान प्राप्ती होणार की नाही, याची निश्चिती होते, असेही ते म्हणाले. डॉ. गुरू यांनी आपल्या व्याख्यानात लोकशाही आणि आधुनिकता, लोकशाही आणि वैचारिकता, लोकशाही आणि बाजारीकरण यांमधील द्वंद्वांची अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानकोंदणातला हिरा असे गौरवोद्गार काढून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, जागतिक ज्ञानाचे असे एकही क्षेत्र नाही की ज्याचा बाबासाहेबांनी अभ्यास केला नाही. अभ्यास आणि कृतीशीलतेचा अनोखा संगम त्यांच्याठायी झाला होता. त्यातून त्यांची विविध ज्ञानरुपे समाजासमोर आली. इतका प्रचंड व्यासंग एकाच वेळी कवेत घेणे, हे सर्वसामान्य मानवाच्या कुवतीपलिकडचे होते, म्हणून बाबासाहेब हे महामानव ठरतात. बाबासाहेबांनी शिका, संघर्ष करा व संघटित व्हा असा संदेश दिला. शिक्षणातून माणसाला माणसाची वेदना वाचता आली पाहिजे. ती वाचता आली की संघर्षाची मानसिकता निर्माण होते. आणि त्या सकारात्मक मानसिकतेमधून येणारा संघर्ष व्यवस्था परिवर्तन घडवून विकासाच्या प्रेरणा निर्माण करतो. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून मानवी हक्कांचे संरक्षण करणारी अत्युत्कृष्ट व्यवस्था या देशात निर्माण केली, असे गोरवोद्गारही त्यांनी काढले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धांचे पारितोषिक वितरणही मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यांचा निकाल पुढीलप्रमाणेः- निबंध स्पर्धा- अमोल पांडुरंग कांबळे (प्रथम), तेजश्री तेजपाल मोहोरेकर (द्वितिय), प्रशांत उत्तम कांबळे व नवनाथ लोखंडे (तृतीय-विभागून). पोस्टर स्पर्धा- तेजश्री तेजपाल मोहोरेकर (प्रथम), अमितकुमार यशवंतराव कांबळे (द्वितिय), तेजस्विनी वसंतराव सलामे (तृतीय).
यावेळी केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रमुख पाहुणे डॉ. गोपाळ गुरू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. जे.एफ. पाटील यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 13 April 2018

विद्यार्थ्यांना किमान एक कलाविषय शिकवायला हवा: डॉ. जब्बार पटेल यांची अपेक्षा


ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार' प्रदान करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. जे.एफ. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. भारती पाटील.डॉ. जब्बार पटेल


शिवाजी विद्यापीठात डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभ उत्साहात


कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: कलात्मक विषयांच्या बाबतीत जाणीव निर्मिती होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून किमान एक तरी कलाविषय शिकवायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज येथे व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार डॉ. पटेल यांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख १ लाख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. पटेल बोलत होते.
Dr. Jabbar Patel
यावेळी डॉ. श्रीमती मणी पटेल यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. जे.एफ. पाटील, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. जब्बार पटेल म्हणाले, आपल्या समाजात कलात्मक विषय तुलनेने कमी शिकविले जातात. जीवनात कला-संस्कृतीचे महत्त्व मोठे आहे. ते लक्षात घेता या शिक्षणाच्या संदर्भात जागृतीची मोठी गरज आहे. सिनेमा असो अगर कोणतीही कलाकृती या माणसाच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत करतात. त्या दृष्टीने कला क्षेत्राकडे पाहण्याची गरज आहे. कलेच्या क्षेत्रात सृजनशील निर्मितीसाठी कलाकारामध्ये धाडस असणे अत्यावश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी कोणताही शिक्षक हा जातिवंत बंडखोर असला पाहिजे, त्या बंडखोरीतूनच विद्यार्थ्यांना घडविण्याची ऊर्मी जन्माला येत असते, असे मतही डॉ. पटेल यांनी व्यक्त केले.
डॉ. पटेल यांनी या प्रसंगी आपल्या नाट्य व चित्रपट क्षेत्रातील वाटचालीचा पटच उपस्थितांसमोर उलगडला. ते म्हणाले, नाटक हा माझ्यासाठी सर्जनशीलतेचा भाग आहे. रंगमंचावरील प्रायोगिकतेमुळेच भालबा केळकर, डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखे महान नाट्यकर्मी घडले. घाशीराम कोतवालमधला राजकीय संदर्भ इतका सशक्त होता की, त्यामधून राज्यव्यवस्थेला अशा घाशीरामांची सातत्याने असणारी गरज अधोरेखित होते. सामना हा माझ्या पहिल्या चित्रपटाच्या मुहुर्ताचा पहिला प्रसंग कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत चित्रित करण्यात आला. मुहुर्ताची फटमार करायला भालजी पेंढारकर, चंद्रकांत मांढरे आणि लता मंगेशकर यांचे येणे आणि कॅमेऱ्यासमोर डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले असा एक मोठाच योग त्या निमित्ताने जमून आला. लता मंगेशकरांनी त्यावेळी कोणतीही बिदागी न घेता केवळ शब्दाखातर सख्या रे.. हे गीत म्हटले. मंगेशकर कुटुंबियांशी जडलेल्या या जिव्हाळ्यातूनच पुढे जैत रे जैतसारखा वेगळा चित्रपट घडून आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाशी निगडित आठवणी सांगताना डॉ. पटेल म्हणाले, या चित्रपटाच्या निमित्ताने देशातल्या दलित, शोषित वर्गाचं दुःख मला अभ्यासता आलं, मांडता आलं. बाबासाहेबांवरील लोकांची निष्ठा आणि प्रेम आजही इतकं प्रचंड आहे की, महाड आणि नागपूर येथील चित्रीकरणादरम्यान दोन ते अडीच लाख लोक स्वतःच्या घरचे जुने कपडे नेसून आणि घरून भाजी-भाकरी घेऊन सहभागी झाले. बाबासाहेबांच्या भूमिकेसाठी जगभर फिरुन योग्य अभिनेत्याचा शोध घेतला, तो अखेर दाक्षिणात्य अभिनेता मामुटीवर येऊन संपला. मामुटीने ज्या पद्धतीने बाबासाहेबांना पडद्यावर साकार केले, त्याला तोड नाही. बाबासाहेबांची विद्वत्ता आणि त्यांची ममतापूर्ण आक्रमकता या अभिनयाद्वारे दाखविण्यास अशक्य असलेल्या गोष्टी त्याने अप्रतिमरित्या साकारल्या, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. एस.एम. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज यांच्यावरील माहितीपट करताना आलेले अविस्मरणीय अनुभवही डॉ. पटेल यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या महान चित्रपटकर्मीला पुरस्कार देताना शिवाजी विद्यापीठ परिवाराला अतिशय आनंद होतो आहे. डॉ. पटेल यांचा जीवनपट त्यांच्याच तोंडून ऐकण्याची अत्यंत दुर्मिळ अशी संधी या निमित्ताने लाभली. त्यांच्या कलाकृतींना सृजनशीलतेचं एक अभिनव असं कोंदण लाभलेलं आहे. त्यांच्या अजरामर कलाकृती या निरंतर आनंददायी ठरणाऱ्या आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्याविषयी चित्रफीतीचे प्रदर्शन करण्यात आले. डॉ. जे.एफ. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मानव्य विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी डॉ. मणी पटेल यांना सौ. अनिता शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे यांच्यासह कणबरकर कुटुंबीय, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.