Friday 9 March 2018

प्राप्त केलेले यश नेहमी प्रवाही असते - कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे



कोल्हापूर, दि.9 मार्च - प्राप्त केलेले यश नेहमी प्रवाही असते म्हणून सातत्याने आपले लक्ष केंद्रीत करुन यशोशिखर गाठले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे यांनी केले.

डावीकडून अमर सासने, प्राचार्य एन.व्ही.नलवडे, डॉ.पी.टी.गायकवाड, कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे, श्री.बिभीषण पाटील, डॉ.डी.आर.मोरे, माजी प्राचार्य व संचालक श्री.सी.आर.घोडसे, डी.डी.भोपळे, आर.पी.आढाव व खेळाडू.


कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते श्री.बिभीषण पाटील यांचा सत्कार

         शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागामार्फत विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभाग सभागृहामध्ये आयोजित 'वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2016-17' या कार्यक्रमामध्ये पुरस्कार प्राप्त खेळाडूंना मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार प्राप्त बिभीषण पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते.
कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, विद्यापीठातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करावेत, यासाठी विद्यापीठामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठीचे विविध उपक्रम खेळाडूंपर्यंत पोहचविले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीस निसर्गतहाच खेळाची आवड असते.  त्यामध्ये कौशल्य प्राप्त करुन कठीण परिश्रमाअंती यशस्वी होणे हा परिवर्तनाचा प्रवास असतोे.  क्रीडारुपी यज्ञामध्ये जोपर्यंत स्वत:ला सिध्द करीत नाही तो पर्यंत खेळाडूंचा उदय होत नाही.  कोल्हापूरला खुप मोठी खेळांची परंपरा आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याने सातत्याने क्रीडाक्षेत्राचा विकास झाला पाहिजे, यासाठी विद्यापीठ नेहमी अग्रेसरपणे कार्यरत आहेे. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये विद्यापीठाची घौडदौड सुरु आहेच, त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देवून खेळाडू नांव लौकिक करीत आहात.  रंगांमध्ये जशी विविधता असते तसे क्रीडा प्रकारातील विविध कौशल्ये आत्मसात करुन खेळाडूंनी यश संपादन केले पाहिजे.  खेळाडूंसाठीच्या अद्यावत क्रीडा सुविधांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  तसेच, विविध सुविधांसाठी विद्यापीठ पाठपुरावा करीत आहे. क्रीडा संचालकांनी जास्तीत जास्त विद्यार्थी क्रीडा प्रकारात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या परिसरातील नवनवीन क्रीडा प्रकारांना प्रोत्साहीत करुन जागतिक पातळीवरील खेळाडू निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी.  एखाद्या नवीन क्रीडा प्रकारातील नवीन पिढी घडविण्याचे, खेळाडूंमध्ये नवऊर्जा निर्माण करण्याचे कार्य केले पाहिजे.
          आपल्या मनोगतामध्ये बिभीषण पाटील म्हणाले, खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये पारंगत होवून देशाचे नांवलौकीक करावेत. विद्यापीठाच्या खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याची क्षमता आहे. त्यामध्ये वाढ करण्यासाठी आधुनिक पध्दतींचा अभ्यास करावा.
           यावेळी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवून सर्वात जास्त 640 गुण संपादन केल्याबद्दल दि न्यु कॉलेज, कोल्हापूर यांना सन 2016-17 चे खेळांमधील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून क्रीडा महर्षि मेघनाथ नागेशकर ट्रॉफी देवून गौरविण्यात आले.
        याप्रसंगी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातील प्रशिक्षक जे.एच.इंगळे यांनी सायटेशनचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.पी.टी.गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ.दीपक पाटील-डांगे यांनी केले. आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण संचालक विजय रोकडे यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ.डी.आर.मोरे यांचेसह संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.

                                                                ----








No comments:

Post a Comment