Saturday 6 January 2018

महात्मा गांधींकडून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कल्पक कृती कार्यक्रम: प्राचार्य आनंद मेणसे


शिवाजी विद्यापीठातील व्याख्यानात बोलताना प्राचार्य आनंद मेणसे. व्यासपीठावर डॉ. मेघा पानसरे.


कोल्हापूर, दि. ६ जानेवारी: महात्मा गांधी यांनी भारतातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा सर्वंकष अभ्यास करून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला अत्यंत विचारपूर्वक व कल्पकतेने कृती कार्यक्रम दिला. लोकसंग्रहाचे दुर्मिळ कसब तर त्यांच्याकडे होतेच, पण या देशातील जनतेच्या भाकरीचा विचार करणारा तो पहिला नेता होता, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग व विदेशी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा इतिहास संशोधन केंद्रात प्राचार्य मेणसे यांचे गांधी समजून घेताना... या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. नंदा पारेकर होत्या.
Prin. Anand Menase
प्राचार्य मेणसे यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी यांच्या अनेक ज्ञात-अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, दक्षिण आफ्रिकेमधून १९१५मध्ये भारतात परतल्यानंतर महात्मा गांधी यांनी गुरू गोपाळकृष्ण गोखले यांच्या आवाहनानुसार देश समजून घेण्यास प्रारंभ केला. त्यातून या देशातील विदारक सामाजिक वास्तव त्यांच्या ध्यानी आले. अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजांपासूनही वंचित भारतीय समाजाचे दर्शन झाल्याने त्यांचे हृदय विदीर्ण झाले. त्याचवेळी या देशाला राजकीय व सामाजिक स्वातंत्र्य मिळविण्यामधील अडचणीही त्यांच्या लक्षात आल्या. या देशातील सुमारे ८० टक्के जनता शेतकरी आहे. त्यांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यांना वाचा फोडायला हवी. म्हणून गांधींनी प्रथमतः चंपानेरचा नीळ सत्याग्रह उभारला. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटन होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले. महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने आपला लढा उभारला, यालाही तत्कालीन परिस्थिती कारणीभूत होती. एक तर सशस्त्र लढ्यानंतर स्वातंत्र्ययोद्ध्यांना तुरुंगात वीस-तीस वर्षे खितपत पडावे लागणार होते. महत्त्वाचे मनुष्यबळ तुरुंगात जाऊ देणे परवडणारे नव्हते. त्याचप्रमाणे १८५७च्या लढ्यानंतर ब्रिटीश सरकारने इंडियन आर्म्स एक्ट, १८५८ आणला होता. या कायद्यामुळे संपूर्ण देश निःशस्त्र झाला होता. या परिस्थितीचे भान गांधींना होते. त्यामुळेच त्यांनी जनतेला छोटा कार्यक्रम द्यायचा, त्यासाठी मोठी शक्ती लावायची आणि तो कार्यक्रम यशस्वी करायचा, असे धोरण ठेवले. व्यापक लोकसहभाग मिळविण्यासाठी गांधीजींचे हे धोरण कमालीचे यशस्वी ठरले. पुढे टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्यलढ्याची व्याप्ती आणि आवेग वाढवत नेऊन अखेर १९४२मध्ये त्यांनी ब्रिटीशांना निर्वाणीचा इशारा दिला.
एकीकडे राजकीय स्वातंत्र्याच्या संदर्भात टिळकांनी सनातन भूमिका घेतली असताना महात्मा गांधींनी काँग्रेसला सामाजिक भूमिका घेण्यास प्रवृत्त केल्याचे सांगून प्राचार्य मेणसे म्हणाले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यक्रमाशी महात्मा गांधी यांचा सामाजिक कार्यक्रम मिळताजुळता होता. देशातील ५० टक्के लोकसंख्या असणाऱ्या महिलांनी स्वातंत्र्यलढ्यात उतरले पाहिजे, असे सांगतानाच अस्पृश्यता निवारणाचा राष्ट्रीय कार्यक्रम त्यांनी घोषित केला. मंदिर प्रवेशाच्या चळवळी केल्या. महिला, दलित यांना मताचा अधिकार असलाच पाहिजे, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्तांतर नव्हे, तर येथील प्रत्येक माणसाला निर्भयपणे जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट त्यांनी बाळगले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या देशात लोकशाही असेल, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. या देशातल्या अखेरच्या माणसाच्या चेहऱ्यावरील चिंतेची सुरकुती कमी करणारी आर्थिक प्रगती आणि औद्योगिकीकरणात समूह-उत्पादन (Mass production) नव्हे, तर समूहांकडून उत्पादन (production by masses) त्यांना अभिप्रेत होते. पर्यावरणपूरक उद्योजकतेला त्यांनी प्रोत्साहन दिले.
गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात भारत आणि आफ्रिका या दोन देशांचे राजकारण केल्याचे सांगून प्राचार्य मेणसे म्हणाले, आफ्रिकेमधील वर्णविद्वेषाविरुद्धचा लढा गांधींनी सुमारे २२ वर्षे लढविला आणि यशस्वी केला. तेथे त्यांना कुली बॅरिस्टर म्हणून हिणवले जायचे. १८६०च्या दुष्काळानंतर आफ्रिकेत स्थलांतरित झालेल्या भारतीयांना संघटित करून त्यांना केवळ वर्णद्वेषातून मिळणाऱ्या वाईट वागणुकीविरुद्ध प्रतिकार करण्यास त्यांनी सज्ज केले. त्यांचे प्रश्न घेऊन गांधी लढले. त्यांच्यावर लादलेला २५ पौडांचा कर संघर्ष करून १२ पौडांपर्यंत खाली आणण्यास सरकारला भाग पाडले. भारतीयांसाठी असलेली हजेरीची प्रथा बंद पाडली. केवळ चर्चमध्ये झालेले विवाह कायदेशीर आणि बाकीच्या विवाहांतून जन्मलेली संतती अनौरस ठरवून त्या कुटुंबांची संपत्ती बेवारस ठरवून जप्त करण्याचे सरकारचे षडयंत्र ओळखून त्याविरुद्ध आवाज उठविला व ते फर्मान मागे घेण्यास भाग पाडले. सफाई कामगार व खाण कामगार यांच्या संघटना उभारल्या आणि त्यांच्या प्रश्नांसाठी सत्याग्रह केले. त्यांनी आपला लढा कोणा व्यक्तीविरुद्ध नव्हे, तर व्यवस्थेविरुद्ध उभारला.
गांधीजींच्या निर्भय व निर्भीडपणाचा दाखला देताना डॉ. मेणसे म्हणाले, बनारस येथे डॉ. एनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या संस्थानिकांच्या अधिवेशनात अवघी दोन मिनिटे बोलण्याची संधी मिळालेल्या गांधीजींनी त्या अवधीत व्हॉईसरॉय लॉर्ड हार्डिंग यांच्या तोंडावर ब्रिटीशांनी या देशातून शांतपणे निघून जावे, असे सांगितले होते, तर देशातील सर्व संस्थाने त्यांच्या संपत्तीसह देशात विलीन व्हावीत, असे संस्थानिकांना सुनावले होते. यापेक्षा निर्भयपणा दुसरा कोणता असू शकेल?
अध्यक्षीय भाषणात डॉ. नंदा पारेकर म्हणाल्या, महात्मा गांधी यांचे विचार व कार्य यांची प्रस्तुतता अजिबात कमी झालेली नाही, उलट वाढलेली आहे. त्यांच्याविषयी बुद्धीभेदी विखार पसरवणाऱ्या विखारी प्रवृत्तींना चपराक देण्यासाठी तरुणांनी गांधी विचार व तत्त्वज्ञानाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याची गरज आहे.
सुरवातीला विदेशी भाषा विभागाच्या डॉ.मेघा पानसरे यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. डॉ. नीलांबरी जगताप यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment