Sunday 5 November 2017

‘शिव-वार्ताः माध्यमांच्या नजरेतून विद्यापीठ’ संकलित वृत्तसंग्रहांचे प्रकाशन




विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाचा उपक्रम

कोल्हापूर, दि. ५ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या संदर्भात विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित झालेल्या निवडक वार्तांचे संकलन असलेल्या शिव-वार्ता: माध्यमांच्या नजरेतून विद्यापीठ या सन २०१५-१६ व २०१६-१७ कालावधीतील संकलित पुस्तिकांचे प्रकाशन आज करण्यात आले. अशा प्रकारे माध्यमांतून प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रीय वार्तांचा संग्रह प्रकाशित करण्याचा हा महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील पहिलाच प्रयत्न आहे.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे आणि तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर प्रा. श्रीकांत भोसले, हर्षवर्धन पंडित, प्रशांत झंपले आदी उपस्थित होते.
या पुस्तिकेच्या संदर्भात बोलताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, कोल्हापूरमधील वृत्तपत्रे आणि पत्रकार यांची शिवाजी विद्यापीठ तसेच शैक्षणिक क्षेत्राकडे पाहण्याची दृष्टी अत्यंत व्यापक व सकारात्मक आहे. याचे प्रत्यंतर या पुस्तिकेच्या पानोपानी येते. शिवाजी विद्यापीठाविषयी प्रत्येक माध्यमकर्मीच्या मनात आपलेपणाची भावना आहे, जी त्यांच्या बोलण्यातून, लिखाणातून जाणवते. विद्यापीठ परिक्षेत्रातील अशा प्रत्येक पत्रकार, संपादक, ब्युरो चीफ, कॅमेरामन, छायाचित्रकार आणि माध्यमांतील सर्व संबंधित घटकांना या पुस्तिका आम्ही समर्पित करीत आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दि. १८ जून २०१५ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला. शिवाजी विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाच्या वतीने कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या कारकीर्दीमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रीय वार्तांचा संक्षिप्त अहवाल या संकलित संग्रहाच्या रुपाने सादर करण्यात आला आहे.
--००--

No comments:

Post a Comment