Tuesday 31 October 2017

विद्यापीठात एकता रॅलीने वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'रन फॉर युनिटी'स फ्लॅग-ऑफ करून प्रारंभ करताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.सोबत विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड.




राष्ट्रीय एकता शपथ प्रदान

कोल्हापूर, दि. ३१ ऑक्टोबर: देशाची अखंडता, एकता आणि एकात्मता अबाधिक राखण्याचा संदेश देत शिवाजी विद्यापीठात आज सकाळी रन फॉर युनिटी रॅलीचे आयोजन करण्यात आले.
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत या दौडीचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून संपूर्ण कॅम्पसमध्ये ही फेरी काढण्यात आली. मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सांगता झाल्यानंतर विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी सहभागींना एकता व एकात्मतेची शपथ दिली.
रॅलीमध्ये प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Friday 27 October 2017

शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनाचे औद्योगिक उपयोजन आवश्यक: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के


शिवाजी विद्यापीठास 'रिलायन्स'च्या संशोधक टीमने भेट दिली. या प्रसंगी झालेल्या बैठकीत बोलताना रिलायन्सच्या टेक्नॉलॉजी ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. संजीव कट्टी. शेजारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

रिलायन्सच्या संशोधकांची शिवाजी विद्यापीठास भेट
कोल्हापूर, दि. २७ ऑक्टोबर: शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनाचे औद्योगिक उपयोजन झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या देशात विकास प्रवर्तनास सुरवात होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स टेक्नॉलॉजी ग्रुपच्या संशोधन व विकास केंद्राच्या शास्त्रज्ञांनी आज शिवाजी विद्यापीठास भेट देऊन येथे उपलब्ध असलेल्या संशोधकीय सुविधांची पाहणी केली. या संशोधक टीमशी संवाद साधताना डॉ. शिर्के बोलत होते.
डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या सर्वच विज्ञान शाखांत आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानविषयक संशोधन सुरू आहे. या संशोधन कार्याला युजीसी, डीएई यांसारख्या देशातल्या प्रथितयश वित्तीय संस्थांकडून आर्थिक पाठबळ लाभले आहे. तथापि, या संशोधनाचा खऱ्या अर्थाने समाजाला लाभ होण्यासाठी विद्यापीठे, वित्तीय संस्था यांच्या बरोबरीने उद्योग क्षेत्र असा त्रिकोण विकसित होण्याची नितांत गरज आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे संशोधन व विकास केंद्र ज्या प्रकल्पांवर काम करीत आहे, त्यातील बहुतेक क्षेत्रांमध्ये शिवाजी विद्यापीठात संशोधन कार्य सुरू आहे. त्यामुळे भविष्यात शिवाजी विद्यापीठ आणि रिलायन्स उद्योग समूह यांच्यातील संशोधन साहचर्य अधिकाधिक विकसित होत जाण्याच्या दृष्टीने या टीमची आजची भेट अत्यंत महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी रिलायन्स टेक्नॉलॉजी ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. संजीव कट्टी यांनी रिलायन्स उद्योग समूहाबरोबरच तेथील संशोधन व विकास केंद्राच्या वाटचालीविषयी सादरीकरण केले. ते म्हणाले, सर्वसामान्य व्यक्ती डोळ्यांसमोर ठेवून रिलायन्स उद्योग समूहामध्ये संशोधनाचे कार्य चालते. त्यामुळे समूह आज पेट्रोकेमिकल्स, वस्त्रोद्योग, दूरसंचार आदी अनेक क्षेत्रांत जागतिक स्तरावर अग्रगण्य कामगिरी बजावत आहे. नवसंशोधन आणि नवनिर्मिती या बळावर देशातील युवकांना आयपी युजर नव्हे, तर आयपी क्रिएटर म्हणून जागतिक ओळख प्रदान करण्यासाठी समूह प्रयत्नरत आहे. हे संशोधन कार्य अधिक मजबूतरित्या व संघटितपणे चालावे, यासाठी प्रायोजित संशोधन प्रकल्प व सह-संशोधन विकास प्रकल्प राबविण्यावर समूहाने भर देण्याचे ठरविले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी समूहाचे उपाध्यक्ष डॉ. नटराजन् वेंकटेश्वरन, उपाध्यक्ष सुरेश अय्यंगार, संशोधक डॉ. प्रथमेश साळवी, ऑपरेशन्स मॅनेजर रंजना काठवटे यांच्याबरोबर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता प्रा. पी.एस. पाटील, प्रा. ए.एम. गुरव, प्रा. जी.एस. गोकावी, प्रा. व्ही.जे. फुलारी, प्रा. ए.व्ही. घुले, प्रा. ज्योती जाधव, प्रा. जी.बी. कोळेकर, प्रा. पी.व्ही. अनभुले, डॉ. डी.एस. भांगे, डॉ. जे.बी. यादव, डॉ. एन.एस. देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. एस.एस. कोळेकर यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. एस.बी. सादळे यांनी आभार मानले.


Monday 16 October 2017

स्थानिक पदार्थांच्या जागतिक मार्केटिंगसाठी

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रयत्न आवश्यक: गिरीष चितळे


Mr. Girish Chitale inaugurating the workshop


Mr. Chitale expressing his views at the workshop, while (from left) Dr. Jaydeep Bagi, Pratap Puranik, Yogesh Kulkarni, Mrs. Pallavi Korgaonkar and Dr. A.K. Sahoo look on.


कोल्हापूर, दि.16 ऑक्टोबर: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थानिक पदार्थांचे जागतिक पातळीवर मार्केटींग करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन चितळे डेअरीचे कार्यकारी संचालक गिरीष चितळे यांनी केले.
वर्ल्ड फूड डेच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने 'अन्न प्रक्रीया उद्योगात व्यवसायाची संधी' या विषयावर विशेष चर्चासत्र आज येथे झाले. या चर्चासत्राच्या द्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चितळे बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआयआयच्या दक्षिण महाराष्ट्र झोनचे अध्यक्ष योगेश कुलकर्णी होते.
Girish Chitale
श्री. चितळे म्हणाले, आज देशामध्ये बारा ते पंधरा टक्के वाटा हा अन्न प्रक्रिया उद्योगाचा आहे. यामुळे या क्षेत्रामध्ये तरुणांना अनेक प्रकारच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. संशोधक विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन मालाच्या किंमती कमी करणे गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहण्याची आवश्यकता आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये विविध प्रकारच्या स्वयंचलि उपकरणांची प्रचंड निकड आहे. कडधान्य, पालेभाज्या, फळे हे आपल्याच देशातील लोकसंख्येला पुरत नाहीत. बऱ्याच ठिकाणी ते पोहोचत नाहीत किंवा खरेदी करता येत नाहीत.  त्यासाठी प्रक्रिया उद्योग पुढे येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन, त्यावरील प्रक्रिया आणि मार्केटिं यांचा योग्य ताळमेळ जमल्यास या क्षेत्रामधील तरुणांना प्रचंड उभारी मिळेल
ते पुढे म्हणाले, जीवन साखळीतील अन्न हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आज आपल्याला प्रक्रिया केलेले अन्न लागते कारण आपण निसर्गापासून लांब झालेलो आहोत. उत्तम आरोग्यासाठी प्रक्रिया केलेले अन्न कमी प्रमाणात खावे. आजचा शेतकरी हा स्वयंपूर्ण नाही. त्याला इतरांवर अवलंबून राहवे लागते. पूर्वी सत्तर ते ऐंशी टक्के इतक्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे धान्य शेतकरी स्वत: पिकवित असे. आज तसे होताना दिसत नाही. 
लोकांच्या बदलत्या गरजांमध्ये संधी शोधता आली पाहिजे, असे युवा संशोधकांना आवाहन करून श्री. चितळे म्हणाले,  भारतातील लोकांच्या खाण्याच्या गरजा बदलत नाहीत, द्धती बदलत आहेत. मोठी झेप घेण्यासाठी छोटया छोटया गोष्टींमधील गॅप पाहायला हवा आणि त्या संधी निर्माण करता आली पाहिजे. मालाची गुणवत्ता टिकविणे, साठवणूक आणि वाहतूक करणे यामध्ये प्रचंड संधी निर्माण झालेली आहे. विद्यापीठ आणि उद्योग यांचे समन्वयाने विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होवू शकते. भारतातील प्रत्येक छोटा व्यापारी आणि उद्योजक हा स्वत:च स्टार्टअप आहे. हे छोटे व्यापारी दोन-तीन वर्षानंतर व्यवस्थापक ठेवून व्यापार पुढे वाढविण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के स्टार्टअप संपून जातात. फुड सेफ्टीमध्ये स्वच्छताविषयक जागृती वाढविणे हे जागति पातळीवर टिकण्यासाठी निकडीचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पल्लवी कोरगांवकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ.जे.एस. बागी, डॉ.ए.के. साहू, प्रताप नाईक, उपकुलसचिव डॉ. जी.एस. कुलकर्णी आणि तंत्रज्ञान अधिविभागातील संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.