Friday 2 June 2017

कोणत्याही आपत्तीवर मात करण्यासाठी

शिस्त, समयसूचकता, प्रशिक्षण महत्त्वाचे

- विश्वास नांगरे-पाटील यांचे प्रतिपादन



शिवाजी विद्यापीठात आव्हान-२०१७चे उद्घाटन

Inauguration Ceremony of Avhan-2017

Shri. Vishwas Nangare-Patil




कोल्हापूर, दि. २ जून: शिस्त, समयसूचकता आणि प्रशिक्षित शरीर व मन या त्रिसूत्रीच्या बळावर जीवनात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्तीवर मात करणे शक्य आहे, असा मूलमंत्र कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यभरातील स्वयंसेवकांना दिला.
शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या दहा दिवसीय आव्हान-२०१७ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन श्री. नांगरे-पाटील यांच्या हस्ते वटवृक्षास जलार्पण करून आज सायंकाळी झाले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
श्री. नांगरे-पाटील यांनी मुंबई येथे २००८ साली २६-११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी हॉटेल ताज येथे दहशतवाद्यांशी दोन हात केले. देशावर ओढवलेल्या या अभूतपूर्व आपत्तीच्या वेळी त्यांनी प्रसंगावधान राखून उपलब्ध शस्त्र आणि मिळालेला मर्यादित कालावधी यांचा अत्यंत पद्धतशीर वापर करून अनेक लोकांचे प्राण वाचवले. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानितही करण्यात आले. या हल्ल्याचे आणि त्याला मुंबई पोलीसांनी अत्यंत शौर्याने केलेल्या प्रतिकाराचे वर्णन साक्षात नांगरे-पाटील यांच्याच तोंडून ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. केस स्टडी म्हणून उपस्थित शिबिरार्थींना त्यांनी या हल्ल्याचे तपशील सांगताना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर केल्याने आणि पदोपदी आपत्ती व्यवस्थापनाची जोड दिल्यामुळेच दहशतवाद्यांचा यशस्वीपणे मुकाबला करता येऊ शकल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ओढवलेल्या आपत्तीचे तातडीने विश्लेषण (इम्पॅक्ट एनालिसीस) करण्याची क्षमता आणि त्यासंदर्भात अचूक निर्णय घेण्याची क्षमता, जलद प्रतिसाद, प्रतिबंधक उपाययोजना यांचे महत्त्व या घटनेच्या माध्यमातून त्यांनी पटवून दिले.
तयारीच्या वेळी घाम गाळला, तर युद्धाच्या प्रसंगी कमी रक्त सांडावे लागते, असा आयुष्यातील यशाचा मूलमंत्र देऊन श्री. नांगरे-पाटील म्हणाले, विद्यार्थी दशेत जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी दशेतच स्वतःमधील कमजोरी शोधून त्या सुधारण्याकडे लक्ष द्या आणि क्षमता ओळखून त्या अधिक टोकदार बनवा. तसे केल्यास आयुष्यात तुम्हाला यश निश्चितपणे मिळेल. पण जेव्हा यशाचे शिखर गाठाल, तेव्हा मात्र आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाप्रती आपले उत्तरदायित्व निभावण्यासाठी कार्यरत व्हा. बायोडाटा, सीव्ही यांच्यापेक्षाही जीवन जगताना स्वतःच्या तसेच इतरांच्या सामाजिक सुरक्षिततेचा विचार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात विकसित करण्यात आलेल्या आणि जिथे देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज आहे, त्या पोलीस गार्डनसह पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार, शहरातील सीसीटीव्हींचा नियंत्रण कक्ष दाखविण्यासाठी आवर्जून घेऊन या, असे आमंत्रण करतानाच या शिबिरार्थींचा उपयोग पोलीस दलासाठी विशेष पोलीस अधिकारी म्हणून करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रातील पोलीस स्थानकनिहाय या स्वयंसेवकांच्या कौशल्याचा उत्कृष्ट वापर करून घेण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
Dr. Devanand Shinde
या आपत्ती व्यवस्थापन शिबिरातून बाहेर पडणारा प्रत्येक स्वयंसेवक हा उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापक बनला पाहिजे, अशी अपेक्षा आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त करून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, केवळ शारिरीक क्षमता विकसित करणे हे या शिबिराचे उद्दिष्ट नाही, तर कोणत्याही आपत्तीला तोंड देण्याची आणि त्यामध्ये सापडलेल्या लोकांना वाचविण्याची कणखर मानसिकता निर्माण करणे, हे आहे. त्यामुळे त्या दृष्टीने या शिबिरामध्ये सहभागी होऊन त्याचा आपल्या संपूर्ण जीवनात लोकांच्या भल्यासाठी सातत्याने वापर करण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठातील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांची माहिती दिली. एन.एस.एस. हे विद्यापीठाचे अविभाज्य अंग असून दरवर्षी सुमारे ३५०० स्वयंसेवक या विद्यापीठात प्रशिक्षण घेतात. यंदा आव्हानच्या यजमानपदामुळे ही संख्या ५००० झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी पूर परिस्थितीत आणि विशेषतः दुष्काळी परिस्थितीत राबविलेल्या एक विद्यार्थी, एक पेंडी, एक विद्यार्थी, एक मूठ धान्य या उपक्रमांचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
या समारंभात वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या माध्यमविद्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी स्वागत आणि एन.एस.एस.चे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. डॉ. संजीवनी पाटील व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, एनडीआरएफचे निरीक्षक एस.डी. इंगळे, प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment