Thursday 27 April 2017

भूगोल अधिविभागाच्या नऊ विद्यार्थ्यांची

इटलीच्या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड


शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाचे डॉ. पन्हाळकर, डॉ. शिंदे यांच्यासमवेत एसजीआय कंपनीत निवड झालेले विद्यार्थी.


कोल्हापूर, दि. २७ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील जिओ-इन्फॉर्मेटिक्स शाखेच्या नऊ विद्यार्थ्यांची एकाच वेळी इटलीच्या एस.जी.आय. या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. कॅम्पस इन्टरव्ह्यूच्या माध्यमातून ही निवड झाली आहे.
या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंन्टरव्ह्यूचे आयोजन विभागातर्फे करण्यात आले होते. एस.जी.आय. (स्टुडिओ गली इन्जेनेरिया) ही इटलीस्थित बहुराष्ट्रीय कंपनी असून या कंपनीचे काम जगातील वीसहून अधिक देशांत चालते. ही कंपनी प्रामुख्याने पर्यावरण, जल नियोजन, नागरीकरण व दळणवळण या क्षेत्रांत काम करते. कॅम्पस इन्टरव्ह्यूअंतर्गत विभागातील एकूण नऊ विदयार्थ्यांचे सिलेक्शन कंपनीमार्फत करण्यात आले. या विद्यार्थ्यांची निवड ही जी.आय.एस. एक्झिक्युटिव्ह व मॅनेजमेन्ट ट्रेनी या पदांसाठी करण्यात आली. एस.जी.आय. (स्टुडिओ गली इंजेनेरिया इंडिया प्रा.लि.) कंपनीचे भारतातही अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत. विभागातील अविनाश शिंदे, सागर चौगुले, सत्यवान धुमाळ, महादेव चव्हाण व सचिन गावडे या विद्यार्थ्यांचे भोपाळ (मध्यप्रदेश) या ठिकाणी 'जीआयएस एक्झिक्युटिव्ह' या पदावर तर, दिपाली पाटील, पुजा ढोबळे, दयानंद बोडके व योगेश काशीद यांची कोल्हापूर येथे 'मॅनजमेंट ट्रेनी' म्हणून निवड झाली आहे. या बॅचमधील काही विद्यार्थ्यांची निवड यापूर्वीच जेनेसिस, मुंबई व टेलिअटलास, पुणे या कंपन्यांत झाली आहे. अंतिम परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच इतक्या महत्त्वाच्या कंपनीत नोकरीची संधी प्राप्त झाल्याने या विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागामध्ये पीजी डिप्लोमा इन जिओइन्फॉर्मेटिक्स हा अभ्यासक्रम २००८पासून चालविला जातो. यामध्ये डिजीटल इमेज प्रोसेसिंग, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, रिमोट सेन्सिंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी लागणारी आधुनिक सॉफ्टवेअर्स व उपकरणे विभागात उपलब्ध आहेत. भौगोलिक माहिती प्रणाली (जीपीएस) ही संगणक आधारीत प्रणाली असून अचूक निर्णय घेण्यासाठी ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सरकारी व खाजगी क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानास अनन्यसाधारण महत्त्व आहे. या प्रणालीचा उपयोग दिवसेंदिवस वाढतोच आहे. कोल्हापूरसारख्या शहरात देखील या प्रणालीचा उपयोग प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन, नागरीकरण, जमिनीचे सर्वेक्षण आदींसाठी करण्यात येतो आहे. उच्च प्रतीच्या उपग्रहाच्या छायाचित्राद्वारे कोणत्याही बाबीचे विश्लेषण करणे या तंत्रज्ञानामुळे अधिक सोपे झाले आहे, अशी माहिती अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. एस.एस. पन्हाळकर यांनी दिली.
या कॅम्पस इंन्टरव्ह्यूचे आयोजन करण्यासाठी भूगोल विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. पी. एन. भोसले, पी. जी. डिप्लोमा इन जिओ-इन्फॉर्मेटिक्सचे समन्वयक डॉ. एस. एस. पन्हाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना डॉ. एस. डी. शिंदे, डॉ. पी. टी. पाटील, श्रीमती विद्या चौगुले यांच्यासह इतर शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

शिवाजी विद्यापीठाचा भारतीय शुगरसमवेत सामंजस्य करार


शिवाजी विद्यापीठाचा पुण्याच्या भारतीय शुगर संस्थेशी सामंजस्य करार झाला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांच्यासह डॉ. पी.एन. भोसले, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. व्ही.बी. ककडे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले.

साखर उद्योगाशी निगडित समस्यांचा ऊहापोह व्हावा: प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांची अपेक्षा

कोल्हापूर, दि. २७ एप्रिल: पश्चिम महाराष्ट्रासह देशातील साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यांचा ऊहापोह करून या उद्योगाला दिशा देण्याचे काम भारतीय शुगरसमवेत झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केली.
विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या पुढाकाराने पुणे येथील भारतीय शुगर ही संस्था आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान सहकार्यवृद्धीबाबत सामंजस्य करार आज सकाळी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. शिर्के म्हणाले, साखर उद्योग सध्या विविध अडचणींतून वाटचाल करीत आहे, हे खरे असले तरी या उद्योगातील व्यवस्थापन आणि गुंतलेल्या अर्थकारणाला योग्य दिशा दिल्यास या उद्योगाचे आणि त्याच्याशी संबंधित शेतकऱ्यांचेही भवितव्य उज्ज्वल आहे. त्यामुळे विद्यापीठ पातळीवर आंतरविद्याशाखीय सहकार्यातून या उद्योगात गुंतलेल्या विविध प्रवाहांचा वेध घेण्यात यावा आणि त्यातून या उद्योगास योग्य दिशा दर्शविण्याचे काम साध्य व्हावे. त्यासाठी पुढील वर्षभरामध्ये राबवावयाच्या विविध उपक्रमांचे वेळापत्रक तयार करून त्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी या प्रसंगी केली.
यावेळी भारतीय शुगर संस्थेविषयी संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी माहिती दिली. १९७५ साली स्थापन झालेली ही संस्था साखर उद्योगास आवश्यक प्रशिक्षणादी उपक्रम राबविण्यात अग्रेसर असून भारतासह पाच देशांमध्ये तिचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. भारतीय शुगर हे प्रतिष्ठेचे पुरस्कारही संस्थेमार्फत देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. सन २०१२-१३ पासूनच शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने साखर उद्योगाविषयी चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी, तर भारतीय शुगरच्या वतीने विक्रमसिंह शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून साखर उद्योगाशी संबंधित विविध प्रशिक्षण कार्यशाळा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, व्याख्याने, मार्दर्शन शिबिरे आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.
सुरवातीला अर्थशास्त्र अधिविभागाचे डॉ. विजय ककडे यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. या प्रसंगी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एन. भोसले, डॉ. एम.एस. देशमुख, एस.टी. कोंबडे आदी उपस्थित होते.

Wednesday 26 April 2017

महर्षी शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांत अपूर्व जागृतीचे कार्य: अमर हबीब




 
कोल्हापूर, दि. २६ एप्रिल: विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शेतकऱ्यांमध्ये अपूर्व जागृती निर्माण करण्याचे महत्कार्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले, असे गौरवोद्गार शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार अमर हबीब यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने आयोजित केलेल्या 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे शेतीविषयक विचार व सद्य:स्थिती' या विषयावर ते बोलत होते. वि.स. खांडेकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील होते.
श्री. हबीब म्हणाले, महर्षी शिंदे सामाजिक कार्याचा परीघ उल्लंघणारे श्रेष्ठ विचारवंत होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शेतकरी परिषदांच्या माध्यमातून शेतकऱ्यांत जागृती करण्याला त्यांनी प्राधान्य दिले. शेतीमालाच्या भावापासून गावगाड्याच्या पुनर्रचनेची बीजे त्यांच्या विचार व कार्यात सामावलेली आहेत. आज महाराष्ट्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. शेतीचे, शेतीमालाचे व शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. अशा काळात महर्षी शिंदे यांच्या विचारांचे औचित्य व द्रष्टेपण भारतीय समाजाला पथदर्शक ठरणारे आहे. आजच्या काळात शेतकरी आंदोलनाची जबाबदारी किसानपुत्रांची आहे. ती पेलण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात महर्षी शिंदे यांचे स्थान अव्वल दर्जाचे आहे. उपेक्षित मानकऱ्यांचे धनी ठरलेल्या शिंदे यांनी विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्याचे विस्मरण ही शोकांतिका ठरेल.
या प्रसंगी डॉ. अशोक चौसाळकर यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. या वेळी डॉ. ल.रा. नसिराबादकर, डॉ. जे.एफ. पाटील, दशरथ पारेकर, सुरेश शिपुरकर, कॉ. दिलीप पवार, आशा कुकडे, डॉ. टी.एस. पाटील, सुनीलकुमार लवटे, संपतराव पवार (बलवाडी), डॉ. प्रकाश पवार, डॉ. पी. ए. अत्तार, डॉ. मेघा पानसरे, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. अवनीश पाटील तसेच शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Monday 24 April 2017

शिवाजी विद्यापीठाच्या नियतकालिक स्पर्धेत ‘अमर’, ‘उमंग’ प्रथम




बिगर व्यावसायिक गट प्रथम क्रमांक- 'अमर'- देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अॅन्ड सायन्स कॉलेज, चिखली (ता. शिराळा, जि. सांगली)- प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील व संपादक डॉ. प्रकाश दुकळे

बिगर व्यावसायिक गट द्वितिय क्रमांक- 'विवेक'-  विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर- प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील व संपादक डॉ. डी.ए. देसाई

बिगर व्यावसायिक गट तृतीय क्रमांक- 'दौलत'- बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटण (जि. सातारा)- प्राचार्य डॉ. शिरीष पवार, संपादक डॉ. बापूराव व्ही. जाधव

व्यावसायिक गट प्रथम क्रमांक - 'उमंग' - सौ. सुशिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे संजय घोडावत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, अतिग्रे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)- प्राचार्य डॉ. व्ही.ए. रायकर, संपादक श्री. योगेश धुळुगडे

व्यावसायिक गट द्वितिय क्रमांक - 'ज्ञानदा'- अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी,
आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली)- संपादक श्री. सचिन मनोहर चव्हाण
व्यावसायिक गट तृतीय क्रमांक- 'व्हर्व्ह'- डॉ. जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,
जयसिंगपूर- प्राचार्य डॉ. ए.के. गुप्ता, संपादक प्रा. प्रशांत पाटील

कोल्हापूर, दि. २४ एप्रिल: शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या नियतकालिक स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असला तरी जास्तीत जास्त महाविद्यालयांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा २०१५-१६चा पारितोषिक वितरण समारंभ व्यवस्थापन परिषद सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
या स्पर्धेत बिगर व्यावसायिक गटात सर्वसाधारण विजेता पुरस्कार देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अॅन्ड सायन्स कॉलेज, चिखली (ता. शिराळा, जि. सांगली) यांच्या अमर (संपादक डॉ. प्रकाश दुकळे) या नियतकालिकाने, तर व्यावसायिक गटात सौ. सुशिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, अतिग्रे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्या उमंग (संपादक श्री. योगश धुळुगडे) या नियतकालिकाने प्रथम क्रमांक पटकाविला.
प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाच्या या नियतकालिक स्पर्धेत ७३ बिगर व्यावसायिक व १५ व्यावसायिक अशी एकूण ८८ महाविद्यालये सहभागी झाली. त्याचप्रमाणे स्पर्धेत १२७ विद्यार्थी व १६४ विद्यार्थिनी अशा एकूण २९१ विद्यार्थ्यांची वैयक्तिक पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली असून त्या बक्षिसापोटी सुमारे ८७ हजार ४९८ रुपये इतक्या रकमेचे धनादेशाद्वारे वितरण करण्यात आले आहे. ही संख्या समाधानकारक असली तरी अद्यापही स्पर्धेच्या परीघापासून दूर असलेल्या महाविद्यालयांनीही या स्पर्धेत सहभागी होण्याची गरज आहे.
बिगर व्यावसायिक गटात द्वितिय क्रमांक कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या विवेक (संपादक डॉ. डी.ए. देसाई) या नियतकालिकाने, तर तृतीय क्रमांक पाटण (जि. सातारा) येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या दौलत (संपादक डॉ. बापूराव व्ही. जाधव) या नियतकालिकाने पटकाविला.
व्यावसायिक गटात आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या ज्ञानदा (संपा. श्री. सचिन चव्हाण) या नियतकालिकाने द्वितिय क्रमांक; तर, जयसिंगपूरच्या डॉ. जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या व्हर्व्ह (संपा. प्रा. प्रशांत पाटील) या नियकालिकाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यावेळी डॉ. शिर्के यांच्या हस्ते विजेत्या महाविद्यालयांचे प्राचार्य व संपादकांचा फिरते चषक व प्रशस्तीपत्रे प्रदान करून गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. वासंती रासम, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. ए.एम. गुरव, प्राचार्य सर्वश्री डॉ. एस.आर. पाटील, हिंदुराव पाटील, डॉ. शिरीष पवार, डॉ. व्ही.ए. रायकर, डॉ. ए.के. गुप्ता यांच्यासह महाविद्यालयांतील शिक्षक, अधिकारी व प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.