Saturday 11 February 2017

भारतीय-पाश्चात्य सुरावटींनी निनादले विद्यापीठ;

तरुणाईच्या आविष्काराने परिसरात चैतन्याची लहर


Western Group Song

Western Group Song

One Act Play

Western Solo

 
Classical Instruments Solo

Folk Orchesttra (Gujrat)

Folk Orchesttra (Assam)

Folk Orchesttra (Kerala)
Poster Making

Poster Making

Poster Making



Collage Making


Collage Making

३२वा अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ युवा महोत्सव (शिवोत्सव-२०१७)


कोल्हापूर, दि. ११ फेब्रुवारी: भारतीय आणि पाश्चात्य सुरावटींनी आज दिवसभर शिवाजी विद्यापीठाचा परिसर निनादला आणि तरुणाईच्या आविष्कारामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याची लहर निर्माण झाली.
३२व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवाचे काल शोभायात्रा आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानंतर आज प्रत्यक्ष महोत्सवातील विविध स्पर्धांना सकाळी साडेनऊपासून सुरवात झाली. आज दिवसभरात विद्यार्थ्यांनी पाश्चात्य गायन, शास्त्रीय वादन, एकांकिका, वक्तृत्व, पोस्टर मेकिंग, कोलाज आणि लोकसंगीत या कलाप्रकारांचे विद्यार्थांनी सादरीकरण केले. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टाबरोबरच त्यांच्या प्रतिभेचीही चुणूक दिसून आली. या विविध स्पर्धांमध्ये होत असलेली एकापेक्षा एक सरस सादरीकरण पाहता विद्यार्थी प्रचंड तयारीने स्पर्धेत उतरल्याचे जाणवत होते. स्पर्धेचा अंतिम निकाल काहीही लागला तरी आज या देशभरातून आलेल्या कलाकार विद्यार्थ्यांनी उपस्थित रसिकांची मने मात्र जिंकली.
आज सकाळी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात वेस्टर्न सोलो या प्रकारातील गीतगायनाच्या स्पर्धांना सुरवात झाली. आपल्याकडे फारसा प्रचलित नसलेला हा गायनप्रकार ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. कानपूर, पुणे, पश्चिम बंगाल, केरळ, बंगळुरू, वाराणसी, आणंद-गुजरात, नागालँड, मुंबई, नागपूर, अमरावती, अलिगढ, अमृतसर आदी ठिकाणच्या विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण केले. दुपारच्या सत्रात येथेच झालेल्या पाश्चात्य समूहगीत गायन स्पर्धेने यावर कळस चढविला. टायटॅनिक, लायन किंगसह अनेक लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या संघांनी ही सायंकाळी श्रवणीय आणि रंगतदार बनविली. पाश्चात्य सादरीकरणाला साजेशी वेशभूषा, केशभूषा त्यांनी केली होतीच, पण सादरीकरणातही हे कलाकार तसूभरही कमी पडले नाहीत, ही बाब विशेष महत्त्वाची ठरली.
लोककला केंद्रात पाश्चात्य संगीताच्या सुरावटींवर विद्यार्थी थिरकत असतानाच संगीत अधिविभागाच्या सभागृहात भारतीय संगीताच्या लय आणि ठेक्यांवर विद्यार्थी अक्षरशः नादावले होते. संगीत अधिविभागात सकाळच्या सत्रात सूरवाद्यांची तर दुपारच्या सत्रात तालवाद्यांची स्पर्धा झाली. सूरवाद्यांमध्ये बासरी, व्हायोलीन, सारंगी, सरोद इत्यादी तर, तालवाद्यांमध्ये तबला, पखावज, मृदंग आदी वाद्यांवर देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शास्त्रीय वादन कौशल्याचे दर्शन घडविले. शास्त्रीय संगीताच्या दर्दी रसिकांबरोबरच तरुण-तरुणींची लक्षणीय उपस्थिती होती. आजची तरुणाई शास्त्रीय संगीत ऐकत नाही, या म्हणण्याला त्यांच्या उपस्थितीमुळे जणू उत्तरच मिळाले.
वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात नाट्यकर्मी आणि रसिक चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती, ती एकांकिका स्पर्धा पाहण्यासाठी. देशभरातून आलेल्या विद्यापीठांच्या संघांचे सादरीकरण, त्यांचे विषयांचे वैविध्य आणि सादरीकरणातील गुणवैशिष्ट्ये, त्यांचे नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा या सर्वच गोष्टी पाहण्यासारख्या होत्या. या साऱ्या विविधतेमधूनही एकांकिका सादरीकरणाचा एकात्म अनुभव देण्यात रंगकर्मी विद्यार्थी यशस्वी झाले. आज एकूण पंधरापैकी आठ विद्यापीठ संघांनी एकांकिका सादर केल्या. त्यामध्ये जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर, चंदीगढ विद्यापीठ, मोहाली, मुंबई विद्यापीठ, चौधरी रणबीर सिंग विद्यापीठ, जिंद, हरियाणा, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई आणि सोलापूर विद्यापीठ या संघांचा समावेश होता. महिलांचे शोषण आणि त्यांचे प्रश्न, नक्षलवाद व जातीयवाद, अश्वत्थामा, चार्ली चॅप्लीनची प्रेरणा, भारत-पाक सीमाप्रश्न आणि माणुसकी आदी विषयांवर एकांकिका सादर केल्या. उद्या उर्वरित विद्यापीठांच्या एकांकिकांचे सादरीकरण होईल.
मानव्यविद्या इमारतीमध्ये सकाळच्या सत्रात पोस्टर मेकिंग तर दुपारच्या सत्रात कोलाज मेकिंगच्या स्पर्धा झाल्या. पोस्टर मेकिंगसाठी विद्यार्थ्यांना ऐनवेळी स्वच्छ वातावरण, स्वस्थ जीवन असा विषय देण्यात आला. १५ विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. एकच विषय असूनही त्याच्या मांडणीतील आणि कल्पनांतील वैविध्य चित्ताकर्षक होते. पर्यावरणाची अनेकविध दृष्ये विद्यार्थ्यांच्या मनातून थेट कागदावर विविध रंगांच्या मिश्रणातून साकारताना पाहणे हा एक आनंददायी अनुभव ठरला.
कोलाज मेकिंग हा विषय तर विद्यार्थ्यांच्या सृजनाचा एक अनोखा अनुभवच देणारा होता. जुनी वर्तमानपत्रे आणि मासिकांचे जुने कागदांचे कपटे कॅनव्हासवर एकत्र येऊन बहुरंगी, बहुढंगी स्वरुप आणि नवेच आकार धारण करीत होते. कुठे निसर्गचित्र, कुठे नितांतसुंदर वृक्षवेल, कुठे थुईथुई नाचणारा मोर तर कुठे चित्ताकर्षक रंगावली असे एक ना अनेक विषयांनी विद्यार्थ्यांचे कॅनव्हास सजत होते.
वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात सकाळच्या सत्रात प्रश्नमंजुषा (क्विझ) स्पर्धा झाली. आजच्या स्पर्धेत १५ विद्यापीठांचे संघ सहभागी झाले. त्यातील सहा संघांची उद्या दुपारी १ वाजता होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. दुपारच्या सत्रात येथे स्वच्छ भारत या विषयावर वक्तृत्व स्पर्धा झाली. या स्पर्धेत इंदूर, नवी दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, नागपूर, थिरुअनंतरपुरम, गुजरात, ग्वाल्हेर, कोट्टायम, मिदनापूर, अमृतसर, कोईमतूर आदी ठिकाणच्या विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

लोकसंगीत ऑर्केस्ट्राला जोरदार प्रतिसाद
आज सायंकाळी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात लोकसंगीत ऑर्केस्ट्राच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धा पाहण्यासाठी तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबरच कोल्हापुरातील लोकसंगीत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. हा लोकसंगीचाचा कार्यक्रम म्हणजे जणू भारताच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविणारा एक नयनरम्य सोहळाच ठरला. यामध्ये पंजाबी, गुजराती, आसामी, केरळी, कर्नाटकी, बंगाली, महाराष्ट्रीय, हरयाणवी, दाक्षिणात्य लोकसंगीताचे प्रगल्भ दर्शनच विद्यार्थ्यांनी घडविले. आपापल्या राज्यांच्या लोकसंस्कृतीचा, लोकपरंपरेचा अभिमान त्यांच्या या सादरीकरणातून ओसंडून वाहात होता. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

उद्याचे कार्यक्रम:
उद्या, रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्पर्धा पुढीलप्रमाणे:
सकाळी ९.३० वाजता- वादविवाद (नीलांबरी सभागृह), इन्स्टॉलेशन (मानव्यविद्या इमारत),
सकाळी १० वाजता- सुगम गायन (भारतीय) (लोककला केंद्र), एकांकिका (वि.स. खांडेकर भाषा भवन),
दुपारी १ वाजता- क्विझ (अंतिम फेरी) (नीलांबरी सभागृह), व्यंगचित्रकला (मानव्यविद्या इमारत)
दुपारी २ वाजता- समूहगीत (भारतीय) (लोककला केंद्र),
दुपारी ४ वाजता- शास्त्रीय गायन (संगीत अधिविभाग), क्ले-मॉडेलिंग (संगीत अधिविभाग)
सायंकाळी ६ वाजता- मूकनाट्य (भाषा भवन)

No comments:

Post a Comment