Tuesday 3 January 2017

शिवाजी विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात




कोल्हापूर, दि. ३ जानेवारी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८६वी जयंती शिवाजी विद्यापीठात विविध उपक्रमांसह अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्रात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.जगन कराडे, इतिहास अधिविभागप्रमुख डॉ. पद्मजा पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. भगवान माने, डॉ. नंदा पारेकर, डॉ. ए. एम. गुरव आदी उपस्थित होते.
राजश्री साकळे मार्गदर्शन करताना.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र व इतिहास अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ व प्रतिबंध' या विषयावर शारीरबोध संस्थेच्या अध्यक्षा राजश्री साकळे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डॉ. पद्मजा पाटील होत्या. श्रीमती साकळे म्हणाल्या, लैंगिक छळ हा भांडवली व्यवस्थेचा भाग आहे, जिथे महिलांकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. कायद्याची अंमलबजावणी करताना महिलांच्या अधिकारांचे आपण संरक्षण व संवर्धन करतो. पुरूषसत्ताक विचारसरणी आणि संस्कार प्रामुख्याने अशा अत्याचारांना कारणीभूत असतात. स्त्रियांनी निर्भय होऊन अशा प्रवृत्तींना जाब विचारला पाहिजे. कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी जनजागृतीची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. एन. डी. पारेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एन्. पी. देसाई यांनी परिचय व स्वागत केले. अविनाश भाले यांनी आभार मानले.
--
सांविधानिक मूल्यांच्या आधारे लोकशाहीचे जतन आवश्यक: डॉ. हरिष भालेराव
भारतीय संविधानाने न्याय, स्वातंत्र्य, समता, मानवता, परस्परांतील जिव्हाळा आणि नैतिकतेची देणगी भारतीयांना दिलेली आहे. या तत्वांच्या आधारे भारतीय लोकशाहीचे आपण जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांनी आज येथे केले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे होते.
डॉ. भालेराव म्हणाले, भारतीय संविधान आणि समान संधी हा मानवतेवर आधारित विचार आहे. समान संधीच्या अनुषंगाने केंद्र-राज्य संबंध, जात, धर्म, वर्ग, पंथाच्या आधारे कोणताही विचार केला जात नाही. देशात कायद्याचे राज्य आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्वांना समान संधी असली पाहिजे. संविधानाच्या कलम १४, कलम १६ आणि मार्गदर्शक तत्त्वांतील ४६व्या कलमानुसार संविधानाने समान संधी देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी एम.एड.ची प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी पल्लवी जोशी यांनी 'मी सावित्रीबाई फुले बोलते' हा एकपात्री प्रयोग सादर केला. समान संधी कक्ष समन्वयक प्रा. डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी कक्षाविषयी माहिती दिली. याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. जगन कराडे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. भगवान माने यांनी प्रास्ताविक केले. विधी विभागाचे प्रभारी विभागप्रमुख व्ही. वाय. धुपदाळे यांनी आभार मानले.  अविनाश वर्धन यांनी सूत्रसंचालन केले.
--
मानव्यविद्या अधिविभागांतर्फे सावित्रीबाईंना अभिवादन
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट, शारदाबाई पवार अध्यासन, नेहरू अभ्यास केंद्र, गांधी अभ्यास केंद्र राज्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. एम.ए.-भाग २ (राज्यशास्त्र)मधील रूचिरा सनदी या दिव्यांग मुलीच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. या वेळी डॉ. भारती पाटील, डॉ. वासंती रासम, प्रा. कविता वड्राळे, प्रा. व्ही.पी.भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. रविंद्र भणगे, डॉ.एन.सी. माळी, डॉ.एस.एस. सुतार, प्रा. जे.जे. साळुंखे, डॉ.रामदास बोलके, मृणाली जगताप यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--
शिक्षणशास्त्र अधिविभागात सावित्रीबाई फुले जयंती
शिक्षणशास्त्र अधिविभागात क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अधिविभागप्रमुख डॉ. पी.एस. पाटणकर यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिवाजी विद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धा २०१६मध्ये यश प्राप्त करणारे संशोधक विद्यार्थी नगिना माळी व एम.एड. प्रशिक्षणार्थी विजय मुत्नाळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सूरज चौगुले यांनी केले. सीमा कदम यांनी आभार मानले. यावेळी डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. गीतांजली पाटील यांच्यासह संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment