Tuesday 3 January 2017

शिवाजी विद्यापीठाच्या दैनंदिनी, दिनदर्शिकेचे प्रकाशन



शिवाजी विद्यापीठाच्या सन २०१७च्या दैनंदिनीचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) कायदा अधिकारी अनुष्का कदम, उपकुलसचिव विभा अंत्रेडी, डॉ. डी.टी. शिर्के, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, डॉ. ए.एम. गुरव.


शिवाजी विद्यापीठाच्या सन २०१७च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत अन्य प्रशासकीय अधिकारी व शिक्षक.

कोल्हापूर, दि. ३ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाची सन २०१७ची दैनंदिनी आणि दिनदर्शिका यांचे प्रकाशन आज कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दैनंदिनी व दिनदर्शिका उत्तम झाल्या असून उत्कृष्ट टीमवर्कचे ते फलित असल्याचे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, गतवर्षीपासून आपण दिनदर्शिका प्रकाशनाला सुरवात केली. यंदाची दिनदर्शिका आकाराने मोठी आणि अधिक रंगीत आहे. यंदाच्या दिनदर्शिकेसाठी विद्यापीठ परिसरात बहरलेली रानफुले असा विषय घेऊन काम करण्यात आले. बारा निवडक छायाचित्रांचा त्यात समावेश केला असून हीच छायाचित्रे आपण दैनंदिनीमध्येही समाविष्ट केली आहेत. अशा प्रकारे दोन्ही उपक्रम समान धाग्याने गुंफण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. दोन्ही उपक्रमांत उच्च निर्मिती मूल्ये जपण्याचा प्रयत्न केला आहे.
या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी विषय निवडीपासून ते अंतिम निर्मिती क्षणापर्यंत कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. डी.के. गायकवाड यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले; तसेच आस्थापना विभाग, मुद्रणालय, उद्यान विभागाचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.
यावेळी बीसीयुडी संचालक डॉ.डी.आर. मोरे, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, दैनंदिनी समितीचे अध्यक्ष डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. ए.एम. गुरव, उपकुलसचिव विभा अंत्रेडी, डॉ. नीलेश बनसोडे, एस.सी. घाटगे, कायदे अधिकारी अनुष्का कदम, सांख्यिकीय अधिकारी अभिजीत रेडेकर, सहाय्यक कुलसचिव निवास माने यांच्यासह प्रशासकीय सेवक उपस्थित होते. यावेळी दिनदर्शिकेच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. विनोद शिंपले, डॉ. मानसिंगराज निंबाळकर आणि मुद्रणालय अधीक्षक भूषण पाटील यांचा कुलगुरूंच्या हस्ते दिनदर्शिका प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला.

कुलगुरूंनी काढलेली छायाचित्रे यंदाच्या दैनंदिनीचे वैशिष्ट्य!
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काढलेली छायाचित्रे हे यंदाच्या विद्यापीठ दैनंदिनीचे वैशिष्ट्य आहे. दैनंदिनीच्या मुखपृष्ठावर विद्यापीठाच्या प्रांगणातील भव्य शिवपुतळ्याचे पावसाळ्यातील प्रतिबिंब आणि मलपृष्ठावर विद्यापीठातील निसर्गरम्य मार्गाचे छायाचित्र आहे. दिनदर्शिकेमधील व दैनंदिनीच्या आतील पानांवरील रानफुलांची छायाचित्रे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी काढली आहेत. या रानफुलांची शास्त्रीय नावे डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी दिली आहेत. दिनदर्शिकेची संपूर्ण मांडणी व निर्मिती विद्यापीठ मुद्रणालयात करण्यात आली आहे. दिनदर्शिकेच्या प्रथम पृष्ठावर कुलगुरू डॉ. शिंदे यांचा शुभसंदेश असून दर महिन्यात विद्यापीठाचे वैशिष्ट्य असणाऱ्या 'नो व्हेईकल डे'सह विद्यापीठाच्या सर्व सार्वजनिक सुट्यांची माहिती वेगळ्या रंगसंगतीद्वारे दर्शविण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment