Wednesday 18 January 2017

रोखरहित व्यवहारांबाबत जागृतीसाठी

विद्यापीठ प्रयत्नशील: डॉ. डी.आर. मोरे




रोखरहित व्यवहारांबाबत जागृतीपर पथनाट्य सादर करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी.

रोखरहित व्यवहारांबाबत कोल्हापूर शहर परिसरातील संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी व नागरिक यांच्या प्रबोधनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष डिजी-व्हॅनला ध्वज दाखविताना प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे, अॅक्सिस बँकेच्या वरिष्ठ अधिकारी रमा मुमाडी यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले आदी.

शिवाजी विद्यापीठ व अॅक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या 'डिजीटल अवेअरनेस प्रोग्राम'चे उद्घाटन करताना प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे व अॅक्सिस बँकेच्या रमा मुमाडी.

विद्यापीठातून डिजी-मेळा उपक्रमास प्रारंभ; ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने विद्यापीठाचा उपक्रम
कोल्हापूर, दि. १८ जानेवारी: रोखरहित (कॅशलेस) व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांत जनजागृती करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सर्वोतोपरी प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि ॲक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिक्षेत्रात डिजीटल अवेअरनेस प्रोग्राम राबविण्यात येणार आहे. या डिजी-मेळाउपक्रमाचा प्रारंभ आज डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ॲक्सिस बँकेच्या पुणे सर्कलच्या वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीमती रमा मुमाडी व कोल्हापूर क्लस्टर हेड नवेंदू कुमार उपस्थित होते.
प्रभारी कुलगुरू डॉ. मोरे म्हणाले, केंद्र सरकारने रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. एक चळवळ म्हणून या गोष्टीकडे सर्वांनी पाहण्याची गरज आहे. जोपर्यंत समाजातला प्रत्येक घटक त्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाही, तोपर्यंत यात यश येणार नाही. नेमकी ही बाब लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने या डिजीटल बँकिंग व्यवहारांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत नेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी एक डिजीटल रथही (डिजी-व्हॅन) तयार केला असून त्या द्वारे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांना ऑनलाइन बँकिंग व्यवहारांबरोबरच मोबाईलद्वारे रोखरहित बँकिंग व्यवहार कसे करावेत, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यावेळी श्रीमती रमा मुमाडी म्हणाल्या, केंद्र सरकारच्या उपक्रमाला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने हाती घेतलेल्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविताना ॲक्सिस बँक परिवाराला आनंद होत आहे. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथनाट्य सादरीकरण करणाऱ्या पथकाला सोबत घेऊन जनजागृती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ॲक्सिस बँकेचे कोल्हापूर शाखेचे सह-उपाध्यक्ष घनश्याम चांडक यांनी कॅशलेस व्यवहार कसे करावेत, यासंबंधी तपशीलवार सादरीकरण केले. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, प्रशासकीय सेवक तसेच ॲक्सिस बँकेचे पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कॅशलेस व्यवहारांबाबत जागृतीपर पथनाट्य सादर करून सर्वच उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमापूर्वी प्रभारी कुलगुरू डॉ. मोरे यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठ व ॲक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या डिजीटल अवेअरनेस प्रोग्रामचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर रोखरहित व्यवहारांबाबत जागृतीसाठी तयार केलेल्या विशेष डिजी-व्हॅनलाही ध्वज दाखवून उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. ही डिजी-व्हॅन पुढील १५ दिवस कोल्हापूर शहर परिसरातील विविध महाविद्यालयांत जाऊन रोखरहित व्यवहारांबाबत जागृती करणार आहे.

No comments:

Post a Comment