Friday 20 January 2017

शिवाजी विद्यापीठाचा ‘सीडीएसएल’समवेत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार



Shivaji University signs an important MoU with CDLS to be a part of National Academic Depository (NAD).



नॅशनल ॲकेडेमिक डिपॉझिटरीमध्ये होणार समाविष्ट; पदवी प्रमाणपत्रे मिळणार डिजीटल स्वरुपात

कोल्हापूर, दि. २० जानेवारी: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, मुंबई अर्थात सीडीएसएलसारख्या महत्त्वपूर्ण डिपॉझिटरी कंपनीसमवेत शिवाजी विद्यापीठाच्या सामंजस्य करारामुळे विद्यापीठाची डिजीटल वाटचाल अधिक जोमाने होईल, असा विश्वास प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांनी आज येथे व्यक्त केला.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात आज शिवाजी विद्यापीठ आणि सीडीएलएस यांच्यादरम्यान नॅशनल ॲकेडेमिक डिपॉझिटरीमध्ये समाविष्ट होण्यासंदर्भात सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. अशा प्रकारचा सामंजस्य करार करणारे शिवाजी विद्यापीठ देशातील अवघे १७वे विद्यापीठ ठरले आहे.
डॉ. मोरे म्हणाले, केंद्र सरकारने डिजीटल इंडिया मोहिमेअंतर्गत केलेल्या डिजीटायझेशनच्या आवाहनाला प्रतिसादादाखल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या पुढाकारातून आजचा सामंजस्य करार साकार होतो आहे. विद्यार्थ्यांना त्यांची पदवी प्रमाणपत्रे, गुणपत्रके तसेच अन्य शैक्षणिक प्रमाणपत्रे डिजीटल स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्या दृष्टीने ही वन स्टॉप ॲकेडेमिक डिपॉझिटरीची सुविधा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरणार आहे. पुढील काळात टप्प्याटप्प्याने शंभर टक्के डिजीटाईज्ड होण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सीडीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एस. रेड्डी म्हणाले, महाराष्ट्रातल्या अग्रगण्य अशा शिवाजी विद्यापीठाशी जोडले जाण्याचा आनंद मोठा आहे. सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या धर्तीवर शैक्षणिक प्रमाणपत्रांची डिपॉझिटरी निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतल्याने त्या जबाबदारीची जाणीवही मोठी आहे. तथापि, या उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्राच्या सक्षमीकरणास चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी यावेळी सदर सामंजस्य कराराचे स्वरुप व महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशींनुसार केलेल्या आवाहनानुसार देशातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यांनी नॅशनल ॲकेडेमिक डिपॉझिटरी (एन.ए.डी.) मध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या डिजीटल इंडिया उपक्रमांतर्गत देशातील सर्व विद्यार्थ्यांची अंतिम गुणपत्रके, दीक्षान्त प्रमाणपत्रे इत्यादी माहिती आधार कार्ड क्रमांकाशी संलग्नित करून राष्ट्रीय डाटाबेसमध्ये ठेवली जाईल. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार सदर माहिती त्यांच्या पुढील शिक्षणासाठी, नोकरीसाठी व प्रमाणपत्रे तपासणीसाठी डिजीटल माध्यमातून वापरता येऊ शकतील. त्यानुसार केंद्रीय मंत्रालयाने नेमून दिलेल्या सीडीएसएल या कंपनीशी विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. यानुसार कंपनीच्या प्रणालीमध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा डाटा डिजीटल स्वरुपात अपलोड करण्यात येईल. प्राथमिक टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थ्यांना डिजीटल पदवी प्रमाणपत्रे देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व स्नातकांपर्यंत याची व्याप्ती वाढविण्यात येईल. यामुळे कागदावरील खर्च वाचेलच, शिवाय विद्यार्थ्यांना त्यांची अधिकृत प्रमाणपत्रे जगाच्या पाठीवर कोठूनही मिळविता येऊ शकतील.
या सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी तर सीडीएसएलकडून श्री. रेड्डी यांनी स्वाक्षरी केल्या. या प्रसंगी कंपनीचे इन्स्टिट्यूशनल बिझनेस हेड सुधीर सरकार, इन्व्हेस्टर एज्युकेशन हेड अजित मंजुरे, कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव आर.डी. सावंत, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी, डॉ. मिलींद जोशी यांच्यासह परीक्षा विभागातील अधिकारी व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Wednesday 18 January 2017

रोखरहित व्यवहारांबाबत जागृतीसाठी

विद्यापीठ प्रयत्नशील: डॉ. डी.आर. मोरे




रोखरहित व्यवहारांबाबत जागृतीपर पथनाट्य सादर करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी.

रोखरहित व्यवहारांबाबत कोल्हापूर शहर परिसरातील संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी व नागरिक यांच्या प्रबोधनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष डिजी-व्हॅनला ध्वज दाखविताना प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे, अॅक्सिस बँकेच्या वरिष्ठ अधिकारी रमा मुमाडी यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले आदी.

शिवाजी विद्यापीठ व अॅक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या 'डिजीटल अवेअरनेस प्रोग्राम'चे उद्घाटन करताना प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे व अॅक्सिस बँकेच्या रमा मुमाडी.

विद्यापीठातून डिजी-मेळा उपक्रमास प्रारंभ; ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने विद्यापीठाचा उपक्रम
कोल्हापूर, दि. १८ जानेवारी: रोखरहित (कॅशलेस) व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांत जनजागृती करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सर्वोतोपरी प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि ॲक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिक्षेत्रात डिजीटल अवेअरनेस प्रोग्राम राबविण्यात येणार आहे. या डिजी-मेळाउपक्रमाचा प्रारंभ आज डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ॲक्सिस बँकेच्या पुणे सर्कलच्या वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीमती रमा मुमाडी व कोल्हापूर क्लस्टर हेड नवेंदू कुमार उपस्थित होते.
प्रभारी कुलगुरू डॉ. मोरे म्हणाले, केंद्र सरकारने रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. एक चळवळ म्हणून या गोष्टीकडे सर्वांनी पाहण्याची गरज आहे. जोपर्यंत समाजातला प्रत्येक घटक त्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाही, तोपर्यंत यात यश येणार नाही. नेमकी ही बाब लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने या डिजीटल बँकिंग व्यवहारांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत नेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी एक डिजीटल रथही (डिजी-व्हॅन) तयार केला असून त्या द्वारे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांना ऑनलाइन बँकिंग व्यवहारांबरोबरच मोबाईलद्वारे रोखरहित बँकिंग व्यवहार कसे करावेत, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यावेळी श्रीमती रमा मुमाडी म्हणाल्या, केंद्र सरकारच्या उपक्रमाला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने हाती घेतलेल्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविताना ॲक्सिस बँक परिवाराला आनंद होत आहे. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथनाट्य सादरीकरण करणाऱ्या पथकाला सोबत घेऊन जनजागृती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ॲक्सिस बँकेचे कोल्हापूर शाखेचे सह-उपाध्यक्ष घनश्याम चांडक यांनी कॅशलेस व्यवहार कसे करावेत, यासंबंधी तपशीलवार सादरीकरण केले. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, प्रशासकीय सेवक तसेच ॲक्सिस बँकेचे पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कॅशलेस व्यवहारांबाबत जागृतीपर पथनाट्य सादर करून सर्वच उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमापूर्वी प्रभारी कुलगुरू डॉ. मोरे यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठ व ॲक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या डिजीटल अवेअरनेस प्रोग्रामचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर रोखरहित व्यवहारांबाबत जागृतीसाठी तयार केलेल्या विशेष डिजी-व्हॅनलाही ध्वज दाखवून उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. ही डिजी-व्हॅन पुढील १५ दिवस कोल्हापूर शहर परिसरातील विविध महाविद्यालयांत जाऊन रोखरहित व्यवहारांबाबत जागृती करणार आहे.

Tuesday 17 January 2017

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी

प्रभारी कुलगुरूंच्या विद्यापीठ संघाला शुभेच्छा




कोल्हापूर, दि. १७ जानेवारी: मिदनापूर (पश्चिम बंगाल) अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या शिवाजी विद्यापीठ फुटबॉल संघातील खेळाडूंनी आज प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. मोरे यांनी यावेळी राष्ट्रीय स्पर्धेतील उज्ज्वल कामगिरीसाठी संघाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, क्रीडा अधिविभागप्रमुख पी.टी. गायकवाड, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, संघ प्रशिक्षक अभिजीत वणिरे, संघ व्यवस्थापक एन.आर. कांबळे यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.
भोपाळच्या बरकतुल्लाह विद्यापीठात गेल्या ४ ते १३ जानेवारी या कालावधीत झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने तृतीय स्थान पटकावले. कर्णधार अक्षय मेथे (शहाजी महाविद्यालय) याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघातील खेळाडू ऋषिकेश मेथे याला स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. हा संघ मिदनापूर येथे दि. ८ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

Friday 13 January 2017

जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शैक्षणिक प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल आवश्यक: डॉ.आदिनारायण कलानिधी






कोल्हापूर, दि.१३ जानेवारी: जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी देशाच्या शैक्षणिक प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल आवश्यक आहे. शिक्षणतज्ज्ञांनी, धोरणकर्त्यांनी समयसुचकता राखून शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन चेन्नईच्या आण्णा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.आदिनारायण कलानिधी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ के.आय.टी.चे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'नॅक पुरस्कृत मूल्यांकन परीक्षणाचा उच्च शैक्षणिक संस्थावर होणारा परिणाम' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या द्घाटन प्रसंगी बीजभाषण करताना डॉ.कलानिधी बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे होते.
डॉ. कलानिधी म्हणाले, आज शिक्षण क्षेत्रासह विविध उद्योग-व्यवसायांत कार्यरत असणाऱ्यांनी काळानुरुप बदलत्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. अभ्यासक्रम आणि शैक्षणिक प्रणालीमध्ये बदल करणे हे आपल्या यंत्रणेपुढील मोठे व्हा आहे. आधुनिकतेची कास धरताना आपल्याला प्रथम शिक्षण द्धती बदलण्याबरोबरच जुन्या झालेल्या अभ्यासक्रमांचे सभोवतालच्या उद्योगांशी सुसंगत असे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. आपल्याकडील रीचशी महाविद्यालये आणि विद्यापीठे शासनाच्या अनुदानावर अवलंबून असल्यामुळे मोठया संकटात सापडलेली आहेत. विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध होत नसल्यामुळे महाविद्यालयां शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटत आहे.
ते म्हणाले, भारत सरकार नॅकच्या माध्यमातून देशभरातील विद्यापीठांचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून आपणाला विद्यापीठांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये उच्च गुणवत्ता प्राप्तीसाठी होत असलेले प्रयत्न लक्षात येतात. यामुळे शैक्षणिक केंद्रांना समाजा चांगला लौकिक प्राप्त होतो. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देणाऱ्या उत्तम दर्जाच्या शिक्षकांची आज मोठी गरज निर्माण झालेली आहे.
      बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या रोजगाराचे प्रमाण ठरते.  त्यामुळे शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञान सातत्याने आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यापीठांची प्रतिष्ठा महाविद्यालयांच्या प्रतिष्ठेवर अवलंबून असते; तसेच, विद्यापीठाच्या शिक्षणाचा दर्जा हा महाविद्यलयांच्या शैक्षणिक दर्जवर अवलंबून असतो.
यावेळी के.आय.टी.चे सचिव साजिद हुदली यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. आर.के. कामत यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. व्ही.व्ही. कार्जिनी यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. के.आय.टी.चे उपप्राचार्य डॉ. एम.एम. मुजुमदार यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रा.एस.एस. माने यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठासह के.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.