Thursday 1 December 2016

शिवाजी विद्यापीठाचे पोर्ट्समाऊथ व वॉलन्गॉन्ग विद्यापीठांशी आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार

महाराष्ट्रातील ‘यंग, बोल्ड व डायनॅमिक’ विद्यापीठाशी जोडले गेल्याचा आनंद: प्रा. पाल अहलुवालिया



 
पोर्ट्समाऊथ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पाल अहलुवालिया

ऑस्ट्रेलियाच्या वॉलन्गॉन्ग विद्यापीठाच्या दुबई कॅम्पसचे प्रा. विजय परेरा.

कोल्हापूर, दि. १ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य करार करून महाराष्ट्रातील एका अत्यंत यंग, बोल्ड आणि डायनॅमिक विद्यापीठाशी संबंध जोडले गेल्याचा आनंद मोठा आहे, अशा शब्दांत यु.के. स्थित पोर्ट्समाऊथ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पाल अहलुवालिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पोर्ट्समाऊथ विद्यापीठ, यु.के. आणि वॉलन्गॉन्ग विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया (दुबई कॅम्पस) या विद्यापीठांशी शिवाजी विद्यापीठाचे सामंजस्य करार आज सकाळी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, वॉलन्गॉन्ग विद्यापीठाच्या दुबई कॅम्पसचे प्रा. विजय परेरा यावेळी प्रमुख उपस्थित होते.
पोर्ट्समाऊथ विद्यापीठाचे संयुक्त संशोधन केंद्र शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसवर उभे करण्याबाबत उभय विद्यापीठांनी तत्त्वतः मान्यता दिली असल्याचे सांगून प्रा. अहलुवालिया म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने संशोधन प्रकल्पांसह संशोधन पत्रिकांतून प्रकाशित केलेले शोधनिबंध अत्यंत उल्लेखनीय आहेत. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधकांनी चालविलेली कामगिरीही लक्षणीय आहे. काल येथील प्राध्यापकांशी झालेल्या चर्चेतून विज्ञानाबरोबरच सामाजिक विज्ञान, भाषा आदी विद्याशाखांमधील संशोधनासाठीची अनेक सामायिक क्षेत्रे सामोरी आली. या विषयांवर पोर्ट्समाऊथ विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ विविध आघाड्यांवर एकत्रित काम करू शकते. संयुक्त संशोधनाच्या अनेक शक्यता व संधी त्यातून पुढे येतील.
वॉलन्गॉन्ग विद्यापीठाचे प्रा. विजय परेरा म्हणाले, आजचा सामंजस्य करार हा ऑस्ट्रेलियन वॉलन्गॉन्ग विद्यापीठाच्या केवळ दुब कॅम्पसपुरता मर्यादित नसून या विद्यापीठाशी संलग्नित सर्व कॅम्पसशी संबंधित असेल. त्यामुळे संशोधन व शैक्षणिक सहकार्याच्या अमर्याद संधी दोन्ही विद्यापीठांसाठी याद्वारे खुल्या झाल्या आहेत. त्याचा दोन्ही विद्यापीठांना मोठा लाभ होणार आहे. दुबई, ऑस्ट्रेलिया, यु.के. व भारत या देशांतील शैक्षणिक व संशोधकीय परस्परसंबंध दृढ होण्यास मदत होईल.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठाचे एकाच वेळी दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी प्रथमच सामंजस्य करार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, पोर्ट्समाऊथ विद्यापीठाचे संशोधन केंद्र शिवाजी विद्यापीठ कॅम्पसवर उभे करण्यास उभय पक्षांनी तत्त्वतः मान्यता दिली असून त्या दिशेने टप्प्याटप्प्याने वाटचाल करण्यात येणार आहे. या सामंजस्य कराराद्वारे या विद्यापीठांमधील विज्ञान, मानव्यविद्या, सामाजिक विज्ञान, भाषा या विद्याशाखांमध्ये परस्पर सहकार्य संबंध प्रस्थापित होतील. या विद्यापीठांमधील शिक्षक, संशोधक आदानप्रदान, संयुक्त संशोधन प्रकल्प, संयुक्त शोधनिबंध प्रकल्प आदींसह इतर अनेक प्रकल्प भविष्यात हाती घेणे शक्य होणार आहे.
यावेळी सामंजस्य करारांवर शिवाजी विद्यापीठाकडून कुलसचिव डॉ. व्ही.डी. नांदवडेकर यांनी तर पोर्ट्समाऊथ विद्यापीठातर्फे प्र-कुलगुरू प्रा. अहलुवालिया आणि वॉलन्गॉन्ग विद्यापीठातर्फे प्रा. परेरा यांनी स्वाक्षरी केल्या.
यावेळी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, आयक्यूएसीचे संचालक डॉ. आर.के. कामत, आंतरराष्ट्रीय समन्वय कक्षाचे संचालक डॉ. ए.व्ही. घुले यांच्यासह प्रा. पी.ए. अत्तार, प्रा. विजय ककडे, प्रा. विजय फुलारी, प्रा. पी.एस. पाटील, प्रा. वासंती रासम, प्रा. ज्योती जाधव, डॉ. जे.एस. बागी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment