Tuesday 20 September 2016

नव्वदोत्तरी समकालीन साहित्य हे अस्वस्थ कालखंडाचे द्योतक: ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे



कोल्हापूर, दि. २० सप्टेंबर: नव्वदोत्तरी समकालीन साहित्य हे अस्वस्थ, व्याकुळ कालखंडाचे द्योतक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठात आजपासून भाषाविषयक २१ दिवसीय विशेष हिंवाळी वर्गास प्रारंभ झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील युजीसीचे मनुष्यबळ विकास केंद्र आणि शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व भाषा विषयांच्या शिक्षकांसाठी विशेष वर्ग आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झाले.
नव्वदोत्तरी समकालीन साहित्याच्या संदर्भात चिंतनपर मांडणी करताना अतुल पेठे म्हणाले, समकालीन असणे हे अनेक बाबींवर अवलंबून असते. प्रत्येक समकालीन निर्मिती ही सार्वकालिक असेलच असे नाही, तथापि, जे साहित्य सार्वकालिक कसोट्यांच्या निकषांवर आपले अस्तित्व सिद्ध करते, ते प्रत्येक काळामध्ये समकालीनच असते. ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले यांच्यासह अगदी शेक्सपिअरची ट्रॅजेडी सुद्धा या निकषांवर समकालीन ठरते. समकालीनत्व हे अशा प्रकारे सिद्ध करावे लागते. आधुनिकता हा समकालीनतेचा महत्त्वाचा अविभाज्य गुणविशेष आहे. तुम्ही आधुनिक नसाल, तर तुम्ही निश्चितच समकालीन नाही. समकालीन असणे म्हणजे तुमचे स्वतःशी, समाजाशी, विश्वाशी जोडले जाणे असते. जो माणूस अशा जोडले जाणारे साहित्य निर्माण करतो, जो धर्म, प्रांत, भाषा, देश अशा साऱ्या भेदांच्या सीमा ओलांडून जाणारी निर्मिती करतो आणि त्या त्या ठिकाणी आपल्या साऱ्या संवेदना, सहवेदनांसह प्रकटतो, प्रतिबिंबित होतो, तो खरा समकालीन ठरतो.
नव्वदोत्तरी संकल्पनेच्या अनुषंगाने बोलताना श्री. पेठे म्हणाले, १९९०च्या दशकापूर्वी समाजात एकरेषीय एकजिनसीपणा होता. तो नव्वदोत्तरी काळामध्ये लोपला आणि नैकरेषीय व विखंडित समाजरचना अस्तित्वात आली. अन्य कोणत्याही भेदांपेक्षा डिजीटल आणि नॉन- डिजीटल अशी जगाची नव्या संदर्भाने विभागणी झाली. या प्रक्रियेमध्ये माणसाच्या मनाचे, त्याच्या ओळखीचे विखंडीकरण झाले, तुकडे पडले. त्याचा शोध घेण्याची प्रक्रिया हे खऱ्या जिवंतपणाचे, समकालीनत्वाचे लक्षण आहे. नव्वदोत्तरी कालखंडात पहिले दशकभर हा तसा चाचपडण्याचा काळ होता. तथापि, त्यानंतर मात्र या अस्वस्थतेवर, व्याकुळतेवर मात कशी करावी, याची एक निश्चित दिशा गवसल्याने आता पुढच्या वाटचालीबाबत एक आश्वस्तता माझ्या मनात आहे. या दिशेचा शोध प्रत्येकाने आपापल्या पातळीवर घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी साठोत्तरी आणि नव्वदोत्तरी समकालीन साहित्यातील विविध प्रवाहांचा वेध घेतला. ते म्हणाले, नव्वदोत्तरी कालखंडाच्या नव्या परिप्रेक्ष्यात श्रमिक, शोषित, दलित, वंचित, महिला यांच्या प्रश्नांनी नवे स्वरुप धारण केले आहे. युवा पिढीला त्यांच्यासमोरील प्रश्नांचा वेध घेऊन दिशा दाखविणाऱ्यांची गरज आहे. नवमध्यमवर्गासमोरचे प्रश्न आणखीच वेगळे आहेत. समाजाच्या एकूणच अस्तित्वासंदर्भातील अनेक समस्यांनी भोवताल ग्रस्त आहे. या सर्वांना सामावून घेणारे, त्यांना दिशा दाखविणारे सकस साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे.

यावेळी पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. एस.ए. सोनावणे यांनीही मार्गदर्शन केले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment