Thursday 29 September 2016

विद्यापीठाच्या अंध विद्यार्थ्यांसाठीच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल; आय.ए.बी.कडून पुरस्कार

शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित आय.सी.टी. विषयक कार्यशाळेत सहभागी झालेले अंध विद्यार्थी. (फाईल फोटो) 

कोल्हापूर, दि. २९ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाने अंध विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून मदुराई (तमिळनाडू) येथे स्थित इंडियन असोसिएशन फॉर द ब्लाइंड (आय.ए.बी.) या संस्थेने आय.एय.बी. एम्पॉवरमेंट चॅम्पियन्स-२०१६ (सिल्व्हर झोन) हा पुरस्कार देऊन विद्यापीठाचा गौरव केला आहे.
शिवाजी विद्यापीठाने गेली काही वर्षे सातत्याने अंध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्न चालविले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हा विद्यार्थी केवळ त्या क्षेत्रातील माहितीअभावी मागे पडू नये, यासाठी विद्यापीठाने जॉज (जॉब एक्सेस विथ स्पीच) हे विशेष सॉफ्टवेअर बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयात अंध विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले आहे. विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातील अंध शिक्षक डॉ. मनोहर वासवानी हे स्वतः या सॉफ्टवेअरवर काम करतात आणि विद्यार्थ्यांना ते वापरण्याचे प्रशिक्षण देतात. विद्यापीठाने या ठिकाणी ब्रेल प्रिंटरही उपलब्ध केला आहे, जेणे करून आवश्यक माहितीची प्रिंट आऊट घेऊन विद्यार्थ्यांना नंतरही वाचता येऊ शकेल. विद्यापीठाचे बॅ. खर्डेकर ग्रंथालय आणि राष्ट्रीय अंध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वेळोवेळी अंध विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण तसेच करिअर संधी यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा, शिबीरेही आयोजित करण्यात येतात.
या पुरस्काराच्या अनुषंगाने माहिती देताना ग्रंथपाल डॉ. नमिता खोत म्हणाल्या, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत विद्यापीठास सर्वसमावेशक शिक्षणाचा पथदर्शी प्रकल्प उभारण्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. अंध विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाच्या विस्तारित इमारतीमध्ये अभ्यासाला बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यांना जास्तीत जास्त वाचन करता यावे, या दृष्टीने ब्रेल ग्रंथालयही टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येत आहे.

योग्य दिशेने काम सुरू असल्याची पोचपावती: कुलगुरू डॉ. शिंदे

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठाने अंध विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय संस्थेने घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, विद्यापीठ अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी करीत असलेले प्रयत्न हे योग्य दिशेने असल्याची पोचपावती या पुरस्काराच्या रुपाने मिळाली आहे. त्याबद्दल आय.ए.बी.ला मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, डॉ. वासवानी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही मनापासून अभिनंदन करतो. विद्यापीठ या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून कार्यरत आहे, यापुढील काळातही अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मिळाली आहे.  

Monday 26 September 2016

भाषा शिकण्याच्या आणि शिकविण्याच्या पद्धतींमध्ये एकवाक्यता गरजेची: प्रा.अलेस्सांड्रा कोन्सोलारो




कोल्हापूर दि.26 सप्टेंबर - भाषा शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पध्दती वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न आहेत. आता, यामध्ये एकवाक्यता असणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन इटली येथील तुरीनो विद्यापीठाच्या प्रा.अलेस्सांड्रा कोन्सोलारो आज येथे केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 'ग्यान' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अधिविभागामार्फत विद्यापीठाच्या व्हर्च्युअल क्लासरुममध्ये आयोजित 'हिन्दी भाषा तथा साहित्य का शिक्षण : विदेशी छात्रों के संदर्भ में' या विषयावरील कार्यशाळेच्या उद्धाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे होते. 'ग्यान' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेली ही पाचवी व्याख्यानमाला आहे. ही कार्यशाळा आठ दिवस चालणार आहे.
हिंदी भाषेच्या प्राध्यापिका अलेस्सांड्रा कोन्सोलारो यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीत हिंदीतून मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, अमेरिका, युरोपमध्ये हिंदी विषयाच्या शिक्षणाचा चांगल्या प्रकारे विस्तार होत आहे. युरोप आणि आफ्रिका या देशांमध्ये हिंदी शिकविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या भारतीयांना प्रथम इंग्रजी भाषेव्यतिरिक्त अन्य भाषा आत्मसात करणे आवश्यक आहे. विदेशामध्ये ज्या-त्या भागातील भाषेच्या ज्ञानाबरोबरच तेथील संस्कृती, इतिहास आदींची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे तेथील लोकांना हिंदी शिकविणे शिकणे सुलभ होईल.
या कार्यक्रमाचे उद्धाटक, पूर्वराजभाषा अधिकारी, बैंक ऑफ महाराष्ट्र पुणे तथा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे माजी सदस्य प्रा.दामोदर खडसे म्हणाले, आपल्या बोलण्यातील हिंदी भाषेत सुसूत्रता आवश्यक आहे. विदेशामध्ये हिंदी विषयाबद्दल खुप कुतूहल आहे. त्यामुळे तेथील लोक हिंदी शिकून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. तेथील लोकांच्या हिंदी विषयातील जिज्ञासू वृतीमुळेच हिंदी भाषेला आज जगभर मागणी प्राप्त झालेली आहे. हिंदी भाषेकडे व्यावसायिक रुपाने पाहिले पाहिजे. हिंदी विषयाबद्दल माहिती देणारे आज बाजारामध्ये मोठया प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स साहित्य उपलब्ध आहे. त्याचा हिंदी भाषा सुधारण्यासाठी चांगला उपयोग करावा. जगभरातील 196 देशांमधील परराष्ट्र मंत्रालयामध्ये हिंदी जाणकारांना नोकरीची उत्तम संधी प्राप्त झालेली आहे. येथील प्रत्येक ठिकाणी किमान सहा ते दहा हिंदी भाषा जाणकारांची गरज असते. हिंदी भाषेकडे रोजगाराची संधी म्हणून पाहण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना कुलगुरु प्रा.डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, सातत्याने विकसित होत असलेल्या हिंदी भाषेला जगामध्ये 425 दशलक्ष लोक प्रथम प्राधान्य तर 120 दशलक्ष लोक द्वितीय प्राधान्य देतात. तुर्की, पारशी, अरबी, पोर्तुगीज, द्रवीड या लोकांच्या भाषीय आक्रमणामध्ये हिंदी भाषा प्रभावित होत गेली. या सर्व भाषांशी हिंदी जोडली गेल्याने ती आंतरराष्ट्रीय भाषा झालेली आहे. विदेशामध्ये हिंदी भाषेमध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत असतानाच दिवसेंदिवस हिंदी भाषेची मागणीही वाढत आहे. आज आपणांस हिंदी भाषेमुळे आंतरराष्ट्रीय रोजगारांची संधी उपलब्ध झालेली आहे. स्पेन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यासह अन्य देशांमध्ये दूरशिक्षणाद्वारे आणि ऑनलाईन हिंदी शिकण्याचे प्रमाण वाढलेले आहे. एखाद्या विषयावर असलेली श्रद्धा, नम्रता आणि योग्यता यामुळे आपणांस सन्मान प्राप्त होतो. हिंदी विषयातील अध्ययन आणि अध्यापन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ग्यान उपक्रम महत्वपूर्ण आहे.
उद्गीर, नांदेड, औरंगाबाद, जालना, म्हैसूर, राजस्थान, बिहार, हैद्राबाद, गोवा येथून आलेल्या 53 संशोधकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. हिंदी अधिविभागप्रमुख प्रा.पद्मा पाटील यांनी कार्यशाळेचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वंदना पाटील यांनी केले तर डॉ. प्रदीप लाड यांनी आभार मानले.