Saturday 25 June 2016

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या शिवाजी विद्यापीठात व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन




वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग, म्युझियम कॉम्प्लेक्स इमारतींचेही होणार भूमीपूजन
 
Shri. Devendra Fadnavis, Hon. Chief Minister
Shri. Vinod Tawde, Hon. Minister for Higher & Technical Education

Shri. Chandrakantdada Patil, Hon. Guardian Minister of Kolhapur


कोल्हापूर, दि. २५ जून: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, रविवार (दि. २६ जून) शिवाजी विद्यापीठात विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन तसेच वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग इमारतीचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या म्युझियम कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात हा कार्यक्रम होईल.
विद्यापीठात उद्या दुपारी ३.४५ वाजता मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन करण्यात येईल. विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयात अत्याधुनिक अशी 'व्हर्च्युअल क्लासरुम' साकारण्यात आली आहे. मल्टिमीडिया प्रोजेक्टर, व्हिज्युअलायझर, इंटरॅक्टीव्ह बोर्ड, डिजिटल पोडियम अशा आधुनिक सामग्रीसह ही क्लासरुम सुसज्ज आहे. या क्लासरुमच्या सहाय्याने नॅशनल नॉलेज नेटवर्कद्वारे विद्यापीठाशी जोडलेल्या १६१ संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, शैक्षणिक आदानप्रदान करणे शक्य होणार आहे. 'ग्यान' उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमालांचाही अधिक व्हर्च्युअल व व्यापक पद्धतीने विद्यार्थ्यांना लाभ देता येणार आहे. सदरची सुविधा राष्ट्रीय उच्चशिक्षण अभियान अर्थात 'रुसा'अंतर्गत निर्माण करण्यात आली असून या सुविधेचा लाभ प्रभावी दूरशिक्षणासाठी होणार आहे.
याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या इमारतीचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे. सन २०१८मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या या अधिविभागाच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना आहे. गेल्या ४८ वर्षांत या अधिविभागाने पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राला अनेक प्रथितयश पत्रकारांची फळी प्रदान केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागासह इलेक्ट्रॉनिक मीडिया, विविध शासकीय आस्थापना तसेच खाजगी जनसंपर्क क्षेत्रात या विभागाचे विद्यार्थी कार्यरत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील आघाडीच्या वृत्तपत्रांत ८० टक्क्यांहून अधिक पत्रकार या विभागाचे विद्यार्थी आहेत. स्वतंत्र इमारतीमुळे या विभागाच्या आधुनिकीकरण व विस्ताराला गती मिळणार आहे.
म्युझियम कॉम्प्लेक्स विद्यापीठाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या इमारतीचे भूमीपूजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सध्या कॅम्पसवर वि.स. खांडेकर स्मृति संग्रहालयासह शाहू लोकजीवन वस्तू संग्रहालय तसेच इतिहास अधिविभागानेही संग्रहालय निर्मितीचे प्रयत्न चालविले आहेत. या तीनही संग्रहालयांचे एकत्रीकरण करून संग्रहालय संकुल विकसित करण्याची व त्याला संशोधनाची जोड देण्याची विद्यापीठाची भूमिका आहे. त्यानुसार या म्युझियम कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment