Monday, 29 August 2016

शिक्षणाद्वारे समाज बदलवून टाकण्याचे बाबासाहेबांचे उद्दिष्ट: उत्तम कांबळे

कोल्हापूर, दि. २९ ऑगस्ट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचे प्रयोजन हे केवळ पदवी किंवा नोकरी मिळविण्यापुरते मर्यादित नव्हते; तर, समाज बदलवून टाकण्याचे उद्दिष्ट त्यांनी शिक्षण घेताना बाळगले होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण' या विषयावर आयोजित व्याख्यान देताना ते बोलत होते. वि.स. खांडेकर भाषा भवनाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे होते.
शिक्षणाच्या प्रयोजनाविषयीच आजच्या व्यवस्थेमध्येच संभ्रम असल्याचे आढळून येते, असे सांगून श्री. कांबळे म्हणाले, आयुष्य घडविणे आणि आयुष्य बदलून टाकणे हा कोणत्याही शिक्षणाचा प्रधान हेतू असतो, असला पाहिजे. अशा शिक्षणातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व घडत असते. क्रमिक अभ्यासक्रमापलिकडे जाऊन संबंधित विषयांचे ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा व प्रज्ञा बाबासाहेबांनी स्वतःमध्ये विकसित केली. या वाचनातून त्यांना प्रश्न पडत. त्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी ते आणखी वाचत. या प्रक्रियेमधून आपल्याला निरतिशय आनंद व समाधान मिळते, असे बाबासाहेब म्हणत असत. खूप प्रश्न पडणे हे चांगल्या शिक्षणाचे लक्षण आहे. अशा प्रकारे पुस्तकांशी त्यांनी लहानपणापासून जिव्हाळा निर्माण केला, तो अखेरच्या क्षणापर्यंत जपला.
बाबासाहेब जेव्हा विलायतेहून शिक्षण घेऊन परतले, तेव्हा ते या देशातले सर्वाधिक उच्चशिक्षित व्यक्ती होते, असे सांगून श्री. कांबळे म्हणाले, बाबासाहेबांच्या या शिक्षण प्रक्रियेचा मुळापासून अभ्यास केल्यास त्यामध्ये त्यांनी मानलेले तीन महागुरू बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांच्यासह त्यांच्या शिक्षणाला दिशा देणाऱ्या त्यांच्या विलायतेतील शिक्षकांचा आणि समकालीन विचारवंतांचाही मोलाचा वाटा राहिला. बाबासाहेबांना कबीराची परंपरा जन्मजात लाभली. विषमतेवर प्रहार करणारा पहिला संत म्हणून हा प्रभाव महत्त्वाचा राहिला. बुद्ध हा असा महान शिक्षक होता, ज्याने आपल्या शिष्यांची कधीही पिळवणूक अथवा शोषण केले नाही. महात्मा फुले यांनी बाबासाहेबांच्या जन्माअगोदरच दलित व महिलांना शिक्षण मिळावे, यासाठी इंग्रज सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून जणू बाबासाहेबांच्या शिक्षणाची पृष्ठभूमी तयार करून दिली. या त्रिगुरूंखेरीज इतिहासतज्ज्ञ जेम्स हार्वे रॉबिन्सन, तत्त्वचिंतक व शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्युई, जेम्स शॉटवेल, प्रोफेसर सेलिग्मन, प्रोफेसर सिडनेवेब या त्यांच्या विलायतेतील गुरूंच्या विचारांचा मोठा प्रभाव बाबासाहेबांवर पडला. या विचारांची कास त्यांनी सदोदित सोबत बाळगली. त्यांच्या पुढील आयुष्यभरातील कार्यामध्ये त्यांच्या या सर्व गुरूंच्या विचारांची व कार्याची परंपरा प्रतिबिंबित होताना दिसते. या सर्व विद्वानांच्या खांद्यावर बाबासाहेब उभे राहिल्याने साहजिकच त्यांच्या विद्वत्तेची व द्रष्टेपणाची उंची वाढली. या विद्वत्तेच्या जोरावरच भारतीय स्वातंत्र्याची संकल्पना विकसित करण्याचे महत्त्वाचे कार्य बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र्य व शहाणपणा यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करण्याचे कार्य त्यांच्याइतके कोणीही केले नाही, म्हणूनच भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये त्यांचे योगदान सर्वार्थाने महत्त्वाचे राहिले. भारतीय समाजाची कोणतीही बाब साक्षरतेविना स्वीकारण्याच्या मानसिकतेवर नेमके बोट ठेवण्याचे कार्यही बाबासाहेबांना शक्य झाले, ते केवळ त्यांनी मिळविलेल्या ज्ञानामुळेच, असेही त्यांनी सांगितले. बाबासाहेब आणि त्यांचे गुरू यांच्यामधील संबंधांचे तपशीलवार स्पष्टीकरण श्री. कांबळे यांनी या वेळी केले. बाबासाहेबांच्या अनेकविध पैलूंचा विविधांगांनी अभ्यास होण्याची गरजही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले, शरीराला जसा सकस आहार आवश्यक असतो, त्याचप्रमाणे शिक्षण हा मन, मेंदू बळकट करणारा सकस आहार आहे. शोषणाची जाणीव करून देऊन त्याविरुद्ध संघर्षाला प्रेरित करते, ते खरे शिक्षण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांकडून अशा शिक्षणाची प्राप्ती अपेक्षित केली होती. आयुष्यभर बाबासाहेबांनी शिक्षण व चिंतनाची जी परंपरा, पद्धती विकसित केली, त्यातून त्यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन प्रतीत होतो, असे ते म्हणाले.
यावेळी केंद्राचे संचालक डॉ. भगवान माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले; तर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी आभार मानले.

Friday, 26 August 2016

विद्यापीठाने आता आणखी उच्च गुणवत्तेचे लक्ष्य बाळगावे

डॉ. आर.एस. माळी यांचे आवाहनProf. Dr. R.S. Mali addressing at Exit Meeting of AAA Committee at Shivaji University, Kolhapur.


Dr. R.S. Mali handling over the report of Science Departments to Dr. D.R. More, Director, BCUD

Dr. S.V. Birajdar handling over the report of Arts & Fine Arts Departments to Dr. D.R. More, Director, BCUD.

Prof.P.V. Konnur and Dr. Ajit Thete handling over the report of Support Services Departments to Dr. D.R. More, Director, BCUD.

Dr. S.L. Hiremath handling over the report of Social Science Departments to Dr. D.R. More, Director, BCUD.


विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यांकनाचे अहवाल सुपूर्द


कोल्हापूर, दि. २६ ऑगस्ट: नॅकच्या मूल्यांकनात राज्यात सर्वाधिक गुणांकनासह '' मानांकन आणि केंद्र सरकारच्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये देशात २८वे व राज्यात पहिले स्थान मिळविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाने आता '+' मानांकनाचे लक्ष्य बाळगून शैक्षणिक, संशोधकीय व प्रशासकीय वाटचाल करावी, असे आवाहन जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू व विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यांकन समितीचे चेअरमन प्रा.डॉ. आर.एस. माळी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी क्षाच्या (आय.क्यू.ए.सी.) माध्यमातून विद्यापीठाचे शैक्षणिक प्रशासकीय ल्यांकन (ए.ए.ए.) बहिस्थ सहयोगी समितीतर्फे करण्याची प्रक्रिया गेल्या तीन दिवसांत राबविण्यात आली. त्या समितीच्या एक्झिट मिटींगमध्ये ते बोलत होते. यावेळी बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे यांच्याकडे डॉ. माळी यांच्यासह अन्य समिती सदस्यांनी विविध विद्याशाखांच्या अधिविभागांचे मूल्यांकन अहवाल सादर केले.
डॉ. माळी म्हणाले, नॅक आणि एनआयआरएफ रँकिंगमधून आपली गुणवत्ता देश पातळीवर सिद्ध केली आहे. ही गुणवत्ता कायम राखण्यासाठीचा उत्साह या मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान शिक्षकांसह सर्वच घटकांमध्ये दिसून आला. तथापि, आता ही गुणवत्ता कायम राखणे इतकेच ध्येय न बाळगता 'नॅक'ने आता नव्याने समाविष्ट केलेल्या अ+ तसेच अ++ मानांकन मिळविण्यासाठी कार्यरत व्हावे. त्यासाठी आपल्या शैक्षणिक, संशोधनपर वाटचालीत सातत्य ठेवण्याबरोबरच सर्व माहितीचे योग्य संकलन, रेकॉर्ड किपिंग ठेवण्यालाही महत्त्व द्यावे. विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे योग्य मूल्यमापन करणे आणि अधिविभागीय स्तरावर कन्सल्टन्सी सेवेबरोबरच प्लेसमेंट सेवा देण्याचाही विचार व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले.
देशातील एक महत्त्वाची 'रायझिंग युनिव्हर्सिटी' अशी शिवाजी विद्यापीठाची प्रतिमा निर्माण झाली असल्याचे गुजरात केंद्रीय विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एस.एल. हिरेमठ यांनी सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र अधिविभागांत सुरू असलेले संशोधनकार्य कौतुकास्पद आहे. तरीही नेहमीच गुणवत्ता वृद्धीसाठी नेहमीच संधी असते, ही बाब लक्षात घेऊन या विद्याशाखांनी अधिक दर्जेदार संशोधन करण्याकडे लक्ष द्यावे. तसेच उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातील विद्यार्थी गळती चिंताजनक असून त्या दिशेने या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच घटकांनी काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी औरंगाबादचे प्राचार्य डॉ. एस.व्ही. बिराजदार, महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण विभागाचे माजी उपसचिव डॉ.अजित थेटे आणि बेळगावच्या राणी चन्नमा विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. पी.व्ही. कोण्णूर या समिती सदस्यांनीही आपली निरीक्षणे नोंदविली.
अध्यक्षीय भाषणात बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे म्हणाले, गुणवत्ता वृद्धीमध्ये सातत्य राखण्यासाठी अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकरवी नियमितपणे मूल्यांकन करवून घेण्याचा शिवाजी विद्यापीठाचा प्रयत्न आहे. या माध्यमातून आपल्या सक्षम बाजू अधिक सक्षम करणे आणि मर्यादांवर मात करणे हे प्रमुख हेतू आहेत. त्या दृष्टीने समितीने नोंदविलेली निरीक्षणे, अभिप्राय आणि सूचना यांच्यावर विचारविमर्श करून पुढील धोरणांची आखणी करण्यात येईल.
या प्रसंगी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. आर.के. कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, समितीचे अंतर्गत सहयोगी सदस्य डॉ.पी.एन. भोसले, डॉ.एल.एन. काटकर, डॉ.राजन गवस डॉ.प्रकाश पवार यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.